अभय देशपांडे
अर्थसंकल्पात शिवसेने असणाऱ्या खात्यांना तसेच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांचा पुरेसा निधी न दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडी सरकार पाडताना, शिवसेना फोडताना त्यांनी हेच कारण सांगितले होते. पण भाजपाने अजित पवारांना सत्तेत आणून पुन्हा शिवसेनेच्या वक्री बसवले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवारांचे निर्णय ते आपल्या अधिकारात फिरवू शकत होते. पण आता तशी स्थिती नाही. विधानसभेत प्रचंड यश मिळूनही मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. सत्तेत सन्मानाचा वाटा, स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी झगडावे लागत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागच्या आठवड्यात शिवसेना व राष्ट्रवादीतील संघर्ष अधोरेखित करणाऱ्या आणखी काही मोठ्या घटना घडल्या आहेत. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले. सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यापूर्वी आपल्याला जराही कल्पना दिली गेली नाही. अशाप्रकारे पैसे वर्ग करणे हे बेकायदेशीर असून वित्त विभागाची मनमानी सुरु आहे. वित्त विभागात काही शकुनी बसले असून, या महाभागानीच हे काम केले आहे, अशा शब्दात मंत्री शिरसाट यांनी वित्त मंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यावर जोरदार टीका केली.
केवळ सामाजिक न्यायच नव्हे तर आदिवासींचा निधीही लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वळवल्याचे समोर आले आहे. एप्रिलचा हप्ता देण्यासाठी या दोन्ही खात्यांमधून अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास खात्याकडे वळविण्यात आले आहेत. यापूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून सुमारे 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील तर ते खातेच बंद करा, अशी उद्विग्नता शिरसाट यांनी व्यक्त केली.
त्यात जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना परवा अजित पवारांनी स्वतःच्या छत्रछायेखाली घेतल्याने शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव देवकर प्रचंड संतापले आहेत. अजित दादांवर देवकर यांनी नेहमी टीका केली. त्यांना काळे झेंडे दाखविले. त्याच गुलाबराव देवकरांना अजित दादांनी पक्षात घेतले आहे. जे आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके खोके म्हणत होते, ते मग काय आता एकदम ओके झाले काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला. देवकर यांच्या बरोबरच माजी राज्यमंत्री डॉ सतीश पाटील, आणि माजी आमदार दिलीप वाघ आणि दिलीप सोनवणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन हे ही संतापले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून आपली सुटका करून घेण्यासाठी हे लोक अजित पवारांच्या आश्रयाला आले असले तरी आपण त्यांना सोडणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे. याचाच अर्थ भविष्यात जळगाव जिल्ह्यात महायुतीतच तुंबळ हाणामारी होणार हे उघड आहे.