Akola News: वंचित बहुजन आघाडीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, लोकशाही पद्धतीने नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड

महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अकोला येथील राजेंद्र पातोडे यांनी विजय मिळवत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाजी मारली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vanchit Bahujan Aghadi Rajesh Patode News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Rajendra Patode News : महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अकोला येथील राजेंद्र पातोडे यांनी विजय मिळवत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाजी मारली. दरम्यान, राज्यातील 22 हजार सक्रिय कार्यकर्त्यांपैकी 8716 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रदेश कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी झाली. अध्यक्षपदासाठी डॉ. अनिल जाधव, राजेंद्र पातोडे आणि सोमनाथ साळुंखे यांच्यात चुरशीची लढत झाली. याचवेळी राज्य कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. त्यावेळी राजेंद्र पातोडे हे बहुमतातून निवडून आले. या निकालानंतर राज्यभरातून राजेंद्र पातोडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी पक्ष संस्थापक ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानत, पक्षांतर्गत लोकशाहीचा हा आदर्श देशातील राजकारणासाठी नवा मार्ग दाखवणारा असल्याचे सांगितले.

‘लोकांच्या मनातील कार्यकारिणी' घडवण्याचा संकल्प'

राजेंद्र पातोडे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्याची भूमिका स्पष्ट केली. वंचित बहुजन आघाडीच्या विविध आघाड्यांना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हमाल, रिक्षाचालक, घरगुती कामगार, महिला तसेच विविध कर्मचारी संघटनांना पक्षाशी जोडून प्रत्येक स्तरावर सक्षम यंत्रणा उभी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रश्नासाठी रस्त्यापासून शासकीय कार्यालयांपर्यंत मदत करणारी संघटना निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांनी निवडून दिलेली कार्यकारिणी ही खऱ्या अर्थाने जनतेच्या भावना आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारी असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

नक्की वाचा >> "कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांसोबत मिटिंग करत नाही", आमदार बालाजी किणीकरांचं खळबळजनक विधान

2029 च्या निवडणुकांसाठी तयारीचा रोडमॅप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘पॉलिटिकल स्कूल' संकल्पनेला पुढे नेण्याचा संकल्पही नव्या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारून कार्यकर्त्यांना निवडणूक व्यवस्थापन, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच 2029 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्षाला अधिक सक्षम करण्याचे ध्येय त्यांनी मांडले. वंचित बहुजन आघाडीला नव्या स्वरूपात उभे करून राज्याच्या राजकारणात प्रभावी पर्याय निर्माण करण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केला.