महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या मेळाव्यातच केली होती. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असावेत असा शिवसेना ठाकरे गटाचा आग्रह आहे. त्यानुसार पक्षाचे नेते वक्तव्यही करत असतात. पण ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर फार वेगळी भूमिका मांडत महाविकास आघाडीलाच एक प्रकारे सुचक इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत नक्कीच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे आपण विठ्ठलाला घातले आहे असे अंबादास दानवे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्या वेळी शिवसेना स्वबळावर लढली. भाजप त्यावेळी युतीत नव्हती. अशा वेळी शिवसेनेच्या जागा या जास्त निवडून आल्या होत्या. म्हणजेच ज्या वेळी युतीत लढले जात नाही. स्वबळावर लढले जाते त्यावेळी जास्त जागा जिंकता येतात असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला तरी तसा अनुभव आहे. असे वक्तव्य करत शिवसेनेच्या मनात नक्की काय चालले आहे याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
महाविकास आघाडीत जागा वाटप हा मोठा विषय नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या सारखेच नेतृत्व हवे अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. सर्वात जास्त आमदार ज्या पक्षाचे त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र पाळले जाते. पण तसे ठरल्यास आघाडीत किंवा युतीत पाडापाडीचे राजकारण होते. त्यामुळे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा निकष असू नये असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. मात्र असं असलं तरी महायुतीचे सरकार घालवणे हे आपले पहिले ध्येय असल्याचे ते म्हणाले.
(नक्की वाचा- शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका)
ज्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेने बरोबर गद्दारी केली त्यांना हटवणे हे आमचे टार्गेट आहे. भाजपलाही धडा शिकवायचा आहे. भाजपने तर महाराष्ट्राला लुटले आहे. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याचा विडाच उचलला असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. शिवाय निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात दंगल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. जे मोर्चे सध्या राज्यात निघत आहेत ते भाजप कार्यकर्ते काढत आहे. वातावरण खराब करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, मी त्याला पाठींबा देईन असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर पणे सांगितले होते. पण त्यांनी केलेल्या मागणीला राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी तेवढे महत्व दिले नाही. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आधी निवडणूक जिंकू नंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू असे सांगत, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण या चर्चेवरच पडदा टाकला होता.