संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'वर जोरदार चर्चा झाली. लोकसभेत सोमवार आणि मंगळवारी चर्चा पूर्ण झाली. मंगळवारी राज्यसभेतही चर्चेला सुरुवात झाली, जी आज बुधवारीही सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेला उत्तर दिलं. त्यांनी यावेळी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. तसंच पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन्ही दहशतवाद्यांना कसं मारलं हे देखील सांगितलं.
POK चुकीच्या धोरणांमुळे गमावले
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) पूर्वीच्या चुकीच्या धोरणांमुळे गमावले गेले होते, परंतु ते परत घेण्याचे काम भारतीय जनता पार्टी (भाजप) करेल. ते म्हणाले की, भारताने दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई केली आणि दहशतवादी तळांवर हल्ला केला. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्यांना स्वतःवरील हल्ला मानले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि निर्दोष भारतीय नागरिकांना लक्ष्य केले. 9 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या एका हवाई तळावर निर्णायक हल्ला करून तो नष्ट केला, ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले.
( नक्की वाचा : PM Modi Speech: ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले का? पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच दिले उत्तर )
व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काल तुम्ही (काँग्रेस) विचारत होता की ते (पहलगाम दहशतवादी) आजच का मारले गेले? त्यांना काल का मारले जाऊ नये? कारण राहुल गांधींना त्यांचे भाषण द्यायचे होते का? संपूर्ण देश पाहत आहे की काँग्रेसची प्राथमिकता राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद संपवणे नाही, तर राजकारण, त्यांची वोट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण आहे.
काँग्रेस वोट बँकेचे राजकारण करत आहे आणि दहशतवादाविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही, या शब्दात शाह यांनी काँग्रेसवर हल्ला केला.
अमित शाह यांनी सांगितले की, तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आणि तांत्रिक माध्यमांतून त्यांच्या फोटोंची जुळणीही झाली. ते म्हणाले की, इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधून काढले आणि त्यांना काश्मीरमधून पाकिस्तानला पळून जाऊ दिले नाही.
तो दिवस विसरु शकत नाही
अमित शाह यांनी सांगितले की, 22 दिवसांपर्यंत सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ड्रोनने पाठवलेल्या जेवणाच्या आधारावर डोंगरावर थांबून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी हल्ला झाला, पंतप्रधान विदेश दौऱ्यावर होते. माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आणि मी त्याच दिवशी श्रीनगरला पोहोचलो. तो दिवस माझ्या आयुष्यातील असा दिवस होता जो मी कधीही विसरू शकत नाही. पाणीही प्यायलो नाही, चहाही नाही. गृहमंत्री म्हणाले की, दहशतवाद्यांनी धार्मिक ओळख विचारून लोकांना मारले, जेणेकरून काश्मीरला दहशतवादातून मुक्त होऊ देणार नाही, असा संदेश देता येईल. काश्मीर दहशतवादातून नक्कीच मुक्त होईल.