गुजरातमधील राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंत झेप घेणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला देशातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनविण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. देशाचं गृहमंत्रीपद भूषविणाऱ्या अमित शाह यांनी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर ते काय करणार आहेत हे पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितले.
अमित शाह काय म्हणाले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की "मी ठरवले आहे की, निवृत्त झाल्यानंतर माझे उर्वरीत आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी वाहीन. नैसर्गिक शेती ही अनेक अर्थांनी फायदेशीर असते. कृत्रिम खतांच्या मदतीने उगवलेला गहू खाऊन कॅन्सर होतो, बीपी वाढतो, मधुमेह होतो, थायरॉईड होतो. खाणाऱ्याचे शरीर चांगले राखण्यासाठी शुद्ध, सात्विक खाणे गरजेचे आहे, त्यामुळे औषधांची गरजच भासणार नाही. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादनही वाढते. त्यांनी म्हटले की, माझ्या शेतात मी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला असून, आज धान्याचे उत्पादन जवळपास 1.5 पटीने वाढले आहे. "
भारतामध्ये अनेक राजकारणी असे आहेत जे वयाच्या 90 पर्यंतही राजकारणात सक्रीय आहेत. वयाच्या मुद्दावरून आणि राजकारणातून निवृत्तीवरून अनेकदा चर्चा झडतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा शरद पवारांबद्दल बोलत असताना त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे असे विधान केले होते. त्यावरूनही बरीच उलट-सुलट चर्चा झाली होती. अमित शाह यांच्या विधानावरून असा तर्क बांधला जात आहे की, राजकारणातून निवृत्ती कधी घ्यायची हे त्यांनी निश्चित केले असून त्यानंतर काय करायचे हे देखील ठरवले आहे.
अमित शाह यांनी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकारिता क्षेत्राशी संबंधित महिला आणि या क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांसोबत एक संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 'सहकार-संवाद' असं या कार्यक्रमाचे नाव होते ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.