मोसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar News : उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या दिवशी किंवा त्याआदल्या दिवशी एबी फॉर्म दिला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. दरम्यान कित्येक उमेदवार आपला 'गुरू' भक्कम करण्यासाठी ज्योतिषाची वाट धरत आहेत.
इच्छुक उमेदवारांची ज्योतिषांकडे धाव
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे इच्छुकांनी आता विजयासाठी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी 'दैवी' शक्तीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय गणिते जुळवण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासोबतच, आपली ग्रहदशा सुधारण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार ज्योतिषांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शहरात सध्या राजकीय चर्चेपेक्षा कुणाची 'कुंडली' वरचढ ठरणार, याचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध ज्योतिष वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांच्याकडे उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आतापर्यंत सुमारे 10 ते 12 प्रमुख इच्छुकांनी पांडव गुरुजींची भेट घेऊन आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी विशेष पूजा आणि विधी करून घेतले आहेत. सोबतच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असावा याची देखील माहिती जाणून घेत आहे.
नक्की वाचा - Maharashtra Politics: संभाजीनगरमध्येही महायुती धोक्यात! राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाच्या निर्णयाने मोठा ट्वीस्ट
उमेदवार कोणत्या पूजा करत आहेत?
उमेदवार कुंडली दाखविण्यासाठी येत आहेत. यामध्ये काहीजण तिकीट मिळविण्यासाठी तर काही विजयासाठी कुंडली शुद्ध करून घेत आहेत. तिकीट मिळण्याकरिता ग्रहांचं बळ वाढविण्यासाठी पूजा केल्या जात आहेत. तिकीट मिळाल्यानंतर विजयश्री प्राप्ती करिता काही अनुष्ठान केले जातात. त्यात बगलामुखी अनुष्ठान केलं जातं. सात्विक अनुष्ठान, बटुक भैरव अनुष्ठान, दुर्गासप्तशती, नवचंडी, सहशतचंडी सारखे अनेक अनुष्ठान केलं जात असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं.