
अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूना दिलासा मिळालेला नाही. अध्यक्षपदाच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. मात्र विरोधकांना आणि सहकार विभागाला जबाब दाखल करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. या प्रकरणी न्यायालय 24 जूनला अंतिम निर्णय देणार आहे. नाशिकच्या न्यायालयाने बच्चू कडूंना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यामुळे नियमानुसार बच्चू कडूंना सहकार विभागाने जिल्हा बँकेचे अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला बच्चू कडूनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणी आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पानसरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. बच्चू कडूंना दिलेली एका वर्षाची शिक्षा उच्च न्यायालयाने निलंबित केली होती. त्यामुळे बच्चू कडूंना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करता येणार नाही, असा युक्तिवाद कडू यांच्या वकीलांनी कोर्टात केला. याच प्रकरणात तक्रारदार असलेल्या विरोधकांनी न्यायालयात कॅवेट दाखल केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती पानसरे यांनी विरोधक व सहकार विभागाला आपले म्हणणे मांडायची संधी दिली आहे. विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 24 जूनला बच्चू कडूंच्या अध्यक्षपदाच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला जाणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: चप्पल फेकली, झिंज्या ओढल्या, कानशिलात लगावली, महिलांची 'मनसे' दे दणा दण
प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला होता. या शिक्षेच्या नियमावर बोट ठेवतं अमरावतीच्या विभागीय निबंधकांनी (सहकारी संस्था) कडू यांच्यावर कारवाई केली होती. त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक तथा अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवले होते. त्यानंतर राजकारणासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. या निर्णयाविरुद्ध कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बच्चू कडूंचे अचलपूर मतदार संघातील परंपरागत विरोधक बबलू देशमुख यांच्या गटाचं वर्चस्व राहील आहे. मात्र तिकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी इकडे काही दिवसांनी बच्चू कडूंनी जिल्हा बँकेतील काँग्रेसच्या सत्तेला सुरंग लावला. कडुनी विरोधी गटातील संचालकांना फोडत जिल्हा बँकेतील सत्ता मिळवत स्वतःकडे अध्यक्ष पद घेतले. तेव्हापासूनच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुरघोड्या पाहायला मिळत आहे. बच्चू कडूना बँकेत अडचणीत आणण्याचे आटोकाट प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. त्यातच बच्चू कडूचे एक जुने प्रकरण विरोधकांच्या हाती लागले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world