Badlapur: बदलापूरमध्ये महाविकास आघाडीत नवा ट्विस्ट, 'चिन्ह नसलेल्या' पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट

Badlapur News : बदलापूरमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची (MVA) मोट बांधली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
 Badlapur Nagar Palika election : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं आहे.
बदलापूर:

 Badlapur Nagar Palika election : बदलापूरमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची (MVA) मोट बांधली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी (BMP), आम आदमी पार्टी (AAP) आणि आरपीआय (आर के गट) अशा Eight पक्षांनी एकत्र येत जागावाटप जाहीर केले आहे. एकूण 24 प्रभागांपैकी 22 प्रभागांमधील जागावाटपाची घोषणा मविआच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.

कसं आहे जागावाटप?

 महाविकास आघाडीने एकूण 45 जागांचे वाटप जाहीर केले केले आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन मुक्ती पार्टी या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 11 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना 6 जागा, काँग्रेसला 5 जागा तर मनसेला 3 जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीला 5, आम आदमी पार्टीला 2 आणि आरपीआय (आर के गट) यांना 1 जागा मिळाली आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: KDMC च्या राजकारणात भाजपाचा 'मेगा प्लॅन'! ठाकरे-मनसेला थेट आव्हान; शिंदे गटालाही धोक्याची घंटा )
 

या जागावाटपात सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीला मिळालेले महत्त्व. या पक्षाकडे स्वतःचे कोणतेही चिन्ह नसतानाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट जागा (म्हणजे 11 जागा) देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. बहुजन मुक्ती पार्टीला इतक्या जास्त जागा दिल्यामुळे मविआने शिवसेना-भाजप युतीला बदलापूरमध्ये 'मोकळे रान' तर करून दिले नाही ना, अशी चर्चा सध्या बदलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दुसरीकडे, बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केले असले तरी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रिया गवळी आणि मनसेकडून संगीता चेंदवणकर अशी दोन नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहेत. या महत्त्वाच्या पदाचा निर्णय उद्या, म्हणजेच 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. याउलट, शिवसेना आणि भाजपने अद्याप आपले कोणतेही उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
 

Topics mentioned in this article