Dombivli News: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात सध्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) धक्कातंत्राचा वापर सुरू ठेवला आहे. भाजपने गुरुवारी (13 नोव्हेंबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले. यामुळे ठाकरे बंधूंना, विशेषतः शिवसेना (उबाठा) गटाला, मोठा राजकीय धक्का बसला असून, आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे शहरप्रमुखही भाजपच्या गळाला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या 'इन्कमींग'मध्ये नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेले दीपेश म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डोंबिवलीतील ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी
ओमनाथ नाटेकर (शिवसेना उबाठा गट शहरप्रमुख)
सचिन कुर्लेकर (शिवसेना उबाठा गट)
हरिश्चंदर परडकर (शिवसेना उबाठा गट)
मिलिंद म्हात्रे (मनसे पदाधिकारी)
गणेश यादव (मनसे पदाधिकारी)
समीर पाटील (मनसे पदाधिकारी)
यावेळी भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे आणि मंदार टावरे हे देखील उपस्थित होते.
( नक्की वाचा : Kalyan News : RPF च्या वर्दीतील 'तो' अधिकारी कोण? ओळख पटताच कल्याण स्टेशनवर खळबळ )
भाजपचे पारडे जड; विरोधकांचे दावे फोल?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सुरू केलेली ही जोरदार पक्षप्रवेश मोहीम पाहता, भाजपचे पारडे अधिक जड होत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या रविवारीही रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश झाला होता.
या इन्कमींगमुळे ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) मोठा फटका बसला असून, पुढील काळातही त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलताना दीपेश म्हात्रे यांनी दावा केला आहे की, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील.
शिंदे गटालाही फटका बसण्याची भीती
भाजपने कल्याण-डोंबिवलीतील आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, ज्या पद्धतीने त्यांची सदस्यसंख्या वाढत आहे, त्याचा फटका शिवसेना (शिंदे गट) या महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षालाही बसू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सध्या तरी महायुती कायम असल्याने निवडणुकीत हा फटका बसणार नाही. मात्र, जर भविष्यात महायुती झाली नाही, तर हा गटबाजीचा भाजपला फायदा आणि शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (एकत्रित) ही भाजपपेक्षा पुढे राहिली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची या पट्ट्यात ताकद मोठी आहे, ज्यामुळे शिंदे गट भाजपला मोठे आव्हान देत आहे.
सध्या कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे नगरसेवक आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार चढाओढ लागली आहे, ज्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world