विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. राज्यात दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात आजवर एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही याबाबतचं वक्तव्य केलं होतं. शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी या विषयावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं'
राजकारणात काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील असं कधीही वाटलं नव्हतं. कारण बाळासाहेबांनी राजकीय जीवनात कधीही पद घेतलं नाही, असं वक्तव्य गोगावले यांनी केलं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात का? हा प्रश्न त्यांना विचारला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
एका जागेवर वाद
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दोन-पाच जागा इकडं तिकडं होतील. पण,सत्ता आणायची असेल तर सर्वांनी सामंजस्यांनी जागा लढवाव्यात आणि महायुतीचं सरकार सत्तेवर आणावं असं गोगावले यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यात एका जागेवर वाद आहे. तो वाद आम्ही सोडवू. जिल्ह्यातील सातही जागा ( 3 शिवसेना, 3 भाजपा, 1 राष्ट्रवादी) आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : राज ठाकरेंचा आदित्य विरोधातील उमेदवार ठरला! संदीप देशपांडेंचं कौतुक करताना म्हणाले... )
स्वपक्षातील आमदारावरच निशाणा
मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं. त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असा गौप्यस्फोट आमदार भरत गोगावले यांनी यापूर्वी केला आहे.
अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर भरत गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला.