Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना, राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांची पातळी खालावताना दिसत आहे. एनडीए (NDA) आणि महागठबंधनचे (Mahagathbandhan) नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधींनी मुजफ्फरपूर येथील एका जाहीर सभेत बोलताना, 'पंतप्रधान मोदी केवळ मतांसाठी काहीही करू शकतात, अगदी स्टेजवर येऊन नाचूही शकतात,' असे म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल?
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "त्यांना (पीएम मोदींना) फक्त तुमचे मत हवे आहे. तुम्ही जर त्यांना सांगितले, 'नरेंद्र मोदी, तुम्ही हे नाटक करा,' तर ते करतील. तुम्ही जर त्यांना म्हटले की, 'आम्ही तुम्हाला मत देऊ, तुम्ही स्टेजवर येऊन नाचा,' तर ते स्टेजवर येऊन नाचूही शकतील."
"निवडणुकीपूर्वी जे काही करून घ्यायचे आहे, ते करून घ्या. कारण, निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तुम्हाला दिसणार नाहीत," असा आरोपही राहुल यांनी केला.
राहुल गांधींनी यावेळी उपस्थितांना महागठबंधनच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. "महागठबंधनचे सरकार सर्व समाज आणि धर्मांचे सरकार असेल. बिहारला पुढे घेऊन जाणे, ही आमची प्राथमिकता आहे," असे ते म्हणाले.
जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित
राहुल यांनी या भाषणात जातीय जनगणनेचा (Caste Census) मुद्दा उपस्थित केला. "लोकसभेत आम्ही पंतप्रधानांना जातीय जनगणना करण्याची मागणी केली होती, पण त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बिहारच्या लोकांचे कौतुक करताना राहुल गांधी म्हणाले की, "इथले लोक सर्वत्र दिसतील. त्यांनी दिल्ली उभी केली, बंगळुरूचे रस्ते बनवले, गुजरातमध्ये काम केले आणि मुंबईला मदत केली. फक्त हिंदुस्तानच्या रस्त्यांचीच गोष्ट सोडा, दुबईसुद्धा बिहारमधील लोकांच्या मेहनतीनेच उभे राहिले आहे."