रामराजे शिंदे, नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत मतदारसंघनिहाय, प्रत्येक विभागानुसार, जातीय गणिते अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत लोकसभेची निवडणूक लढलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक नेत्यांचा स्वप्नभंग होऊ शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याशिवाय विद्यमान आमदारांपैकी काहींचे तिकीट कापले जाण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच चांगली कामगिरी असलेल्या आमदारांना पुन्हा तिकीट दिलं जाणार आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना मेरिटच्या आधारे तिकीट वाटप होणार आहे. पहिल्या यादीमध्ये मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
( नक्की वाचा : निर्णयांचा धडका आणि घोषणांचा पाऊस, महायुती सरकारनं घेतले आणखी 15 निर्णय )
बैठकीला पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा, अमित शाह, महासचिव विनोद तावडे, राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ इत्यादी नेते उपस्थित होते.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर बोलताना म्हटलं की, महायुती 288 जागांवर लढणार असून राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. आजच्या बैठकीत आमच्याकडील सध्याच्या जागांवर चर्चा झाली. अमित शाह आणि सर्व पदाधिकारी बैठकीत होते. विधानसभेसाठीच्या संभाव्य नावांवर देखील चर्चा झाली.
(नक्की वाचा- "फडणवीसांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही"; आमदार भातखळकरांचा विरोधकांवर हल्लाबोल)
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. येत्या 16 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर होईल. कोणाला तिकीट द्यायचे आणि नाही हा अधिकार केंद्रीय निवडणूक कमिटीचा आहे.