भाजपच्या स्थापना दिन सगळीकडे साजरा केला जात आहे. अशा वेळी भाजपमधील गटबाजी ही उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. असं असलं तरी चंद्रपूरातील चित्र मात्र थोडं वेगळं आहे. इथ भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसले. स्थापना दिवसाचे आयोजन शहरात दोन ठिकाणी करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नक्की जायचं कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वाद अजूनही शमलेला नाही. त्याचा अनूभव चंद्रपूरकरांनी पुन्हा एकदा घेतला. निमित्त होतं भाजपच्या स्थापना दिवसाचं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात स्थानपा दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला.
ट्रेंडिंग बातमी - Latur News: अडीच वर्ष गुंगारा दिला, पोलीस येताच गटारात लपला, पुढे जे झालं ते...
जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई उपस्थित होत्या. शिवाय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ही उपस्थिती लावली होती. एकाच वेळी, एकच पक्षाचे, एकच शहरात, दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली होती. कोणत्या नेत्याकडे जावे, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध जोरात रंगू लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते असं बोललं जातं. त्यानंतरही जोरगेवार उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळू नये,यासाठी फिल्डींग लावली होती असं बोललं जातं. त्यामुळेच मुनगंटीवर हे मंत्रिपदापासून वंचित राहीले आहेत. या सर्व गोष्टी पाहाता शोभाताई फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी कुणाचे थेट नाव घेण्याचे टाळले. पण त्यांचा इशारा कुणाकडे होता हे मात्र उपस्थित सर्वांना समजले.
ट्रेंडिंग बातमी - Cyber crime: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जेष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा
मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला. त्यांनी जोरगेवार यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हीच संधी साधत शोभाताई यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. त्यांनी या कार्यक्रमात यायला हवे होते. आपल्या पक्षाला काँग्रेस करू नका, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. या सर्व गोष्टी पाहाता भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून आले. मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असं चित्र सध्या तरी चंद्रपूरात आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळातही बाबत उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत.