
मनोज सातवी
डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका 71 वर्षीय जेष्ठ नागरिकाची तब्बल 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाइन लूट करण्यात आली आहे. ही घटना बोईसर परिसरात घडली आहे. तर, दुसरीकडे पालघरच्या मनोर येथील, आणखी एका 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फेसबुकवर शेअर मार्केट ट्रेडींग द्वारे जास्त पैसे कमविण्याचे अमिष दाखवण्यात आले. दाखवून त्यांची देखील 1 कोटी 8 लाख 48 हजार 765 रुपयांची फसवणुक केली आहे. त्यामुळे सायबर क्रिमिनल्सच्या रडारवर आता ज्येष्ठ नागरिक आहेत. या दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 4 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोईसर जवळील तारापूर अणुऊर्जा प्रकल्प वसाहतीत एका 71 वर्षीय सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप कॉल आला होता. अंधेरी पोलीस ठाणे येथून प्रमोद शंकर भोसले आणि प्रदीप सावंत नावाच्या व्यक्ती बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. "तुमचा मोबाईल अवैध ॲडव्हर्टायझिंग आणि हॅरसमेंटमध्ये ट्रेस झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी गेले आहे. सीबीआयमार्फत याचा तपास करण्यात येणार आहे. तुम्हाला अटक करण्यात येणार असून तपासात सहकार्य न केल्यास पोलीस घरी अटक करतील असं त्यांना धकमावण्यात आले.
शिवाय, याबाबतची गुप्तता ठेवली नाही तर पाच वर्षांहून अधिकची शिक्षा भोगावी लागेल. अशी बतावणी या दोघांनी केली. त्यानंतर सीबीआयचा वकील असल्याचे सांगत आणखी एका व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेण्यात आले. " तुम्ही सीनियर सिटीजन आहात म्हणून यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर आमचे ऐकावे लागेल. हे एक सिक्रेट मिशन असून जर तुम्ही ऐकला नाही तर तुम्हाला अटक होईल. त्याचा मुलीला देखील त्रास होईल" असे सांगण्यात आले. या चौकशीसाठी तुमच्या बँक खात्यांची सीबीआय आणि रिझर्व बँक मार्फत तपासणी करून ही रक्कम 10 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला परत करण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर तब्बल 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम आरोपींनी आपल्या खात्यात वळवून घेतली. परंतु, 10 मार्चची मुदत उलटली तरीही पैसे काही परत जमा झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकानी बोईसर पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दाखल केली.
तर, दुसऱ्या घटनेत आणखी एक 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फेसबुकवर अकाउंटवर रिल्स पाहत असतांना Samco Sevurities Team स्टॉक गुंतवणू संदर्भात रिल्सलाच्या लिंकला लाईक केले. त्यानंतरे VIP826 गृप मध्ये अॅड झाले. शेअर मार्केट ट्रेडींग संदर्भात अधिक पैसे मिळवून देण्याचे अमिष त्यावर त्यांना दाखवण्यात आले. शिवाय त्यांचे खाते चालु केल्याचे सर्टीफिकेट दिले. गुंतवणुकीसाठी सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यावर 17 लाख 10 हजार रुपये भरणा केल्यावर सॅमको अॅपवर शेअर्स खरेदी केल्याने, फिर्यादीचे समको अॅपच्या खात्यावर 2 कोटी 95 लाख रुपये जमा झाल्याचे दाखवले. ही जमा झालेली रक्कम काढण्यासाठी सर्वीस टॅक्स 40 लाख रुपये भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. आता 17 लाखांच्या गुंतवणुकीवर जवळपास तीन कोटी रुपये मिळाल्याने ते काढण्यासाठी चाळीस लाख रुपये भरायला काय हरकत आहे असा विचार या जेष्ठ नागरिकांनी केला. तो जाळ्यात आणखी अडकत गेला.अशाच पद्धतीने आरोपींनी या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 1 कोटी 8 लाख 48 हजार 765 रुपयांचा चुना लावला.
ट्रेंडिंग बातमी - Beed News : बीडमधील तरुणीचं राज्यभरातून कौतुक, कायदा क्षेत्रात केली मोठी कामगिरी
पालघर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत काही रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे, शिवाय डिजिटल अरेस्टप्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. शिवाय पालघर पोलिसांनी अशा प्रकारच्या होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील अशा गुन्ह्या बाबतची माहिती नागरिकांना देत आहेत. जेणेकरून नागरिकांची अशा पद्धतीची फसवणूक होणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world