भाजपा नेते आणि माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर एक मोठा प्रसंग ओढवला. त्यांच्यासह आमदार स्नेहा दुबे आणि आमदार राजन नाईक यांना या धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. वसई पश्चिम येथील अपुलेंट ग्रँड बँक्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी येथे दरेकरा कार्यक्रमाला जात होते. यावेळी ते लिफ्टने जात होते. मात्र त्याच वेळी लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे लिफ्टमध्येच अडकली. लाईट बंद झाला. त्यावेळी दरेकर त्या लिफ्टमध्ये होते.
जवळपास सात ते आठ मिनिटे लिफ्टमध्ये ते अडकून पडले होते. घटनेवेळी लिफ्टमध्ये भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते. लिफ्टमधून कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तत्काळ मदत मागवण्यात आली आणि लिफ्टचे दरवाजे तोडून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लिफ्ट अडकल्यानंतर ती सुरू करण्यासाठी एकच धावपळ झाली. तोपर्यंत सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता.
ही घटना सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबीर या कार्यक्रमाच्या आधीच घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र कार्यक्रमानंतर ही घटना चर्चेचा विषय ठरली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेवर आणि इमारतीतील तांत्रिक देखभालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. आपण पुर्ण पणे सुरक्षित असल्याचं यावेळी प्रविण दरेकर यांनी सांगितलं. पण असा कार्यक्रमावेळी अधिक काळजी घेण्याची गरज ही त्यांनी या निमित्ताने बोलून दाखवली.