मुंबई : दादरा आणि नगर हवेलीतून सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर शिवसेनेच्या तिकीटावरुन निवडून आल्या होता. आता भाजपच्या दुसऱ्या उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव आल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये गुजरातमधील एका भाजप नेत्याच्या नावाचा उल्लेख होता आणि आता भाजपच्या तिकीटावरुन डेलकर यांच्या पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मोहन डेलकर यांच्या पत्नीला तत्कालिन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवार महेश गावित यांचा तब्बल ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला होता. आता त्याच कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरेंना धक्का...
२२ फेब्रुवारी २०२१ रोजी दादरा-नगर हवेलीचे तत्कालीन खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील सी ग्रीन साऊथ या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी सुसाइड नोट लिहून अनेकांवर आरोप केले होते.शिवसेनेत फूट पडल्यानंतर कलाबेन डेलकर या उद्धव ठाकरे गटासोबत राहिल्या होत्या. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपचे महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली होती.
आतापर्यंत ठाकरे गटासोबत असलेल्या कलाबेन डेलकर यांचं नाव भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत आल्याने उद्धव ठाकरेंना धक्का आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा कार्यक्रमही करण्यात आला नव्हता आणि थेट त्यांचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत आल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहे. दरम्यान कलाबेन डेलकर यांनी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये त्यांनी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे कलाबेन डेलकर यांचे पतीन मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात काँग्रेस नेत्याकडून भाजपवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता सचिव सावंत यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात भाजपच्या भूमिकेचा तपास करण्याची मागणी केली होती.
डेलकरांची १५ पानांची सुसाइड नोट...
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी १५ पानांची गुजराती भाषेत सुसाइड नोट लिहिली होती. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी दक्षिण मुंबईतील सी ग्रीन साऊथ या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्यावर अन्याय होत असून मतदारसंघात काम करण्यावर बंधंन आणली जात असल्याचा उल्लेख डेलकरांच्या सुसाइड नोटमधून आढळून आला होता. याशिवाय अपमान, भेदभाव अशा शब्दांचाही उल्लेख होता.
गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला होता.