मराठ्यांना सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीवर सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर हा निर्णय घेताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी राज्यातील ओबीसी नेते आक्रमक आहेत. विरोधी पक्षांनी या विषयावर राज्य सरकाला सवाल विचारले आहेत. त्याचवेळी 'मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उध्दव ठाकरेच' आहेत, असा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'गोल गोल बोलू नका…'
केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर या विषयावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता व न्यायालयात टिकणारे असे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. पण उध्दव ठाकरे हे मराठा आरक्षण कसे मिळावे यावर बोलायला तयार नाहीत.
मराठा मोर्चाची खिल्ली उध्दव ठाकरे यांच्याच मुखपत्रातून करण्यात आली. मराठा आंदोलकांना मारहाण उबाठाच्या नेत्यांनी केला. मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायलयात उध्दव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर उबाठाचा बहिष्कार घातला.
( नक्की वाचा : Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन )
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. आता तरी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा नुसत गोल गोल बोलू नका…' असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी दाखवले होते भाजपाकडं बोट
मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी सतत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मागणी होत होती. यावर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे कोणत्याही राज्य सरकारच्या हातात नाही हेही सत्य आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर तसा निर्णय केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटले पाहीजे. आरक्षणाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना दुखवायचं की नाही हे मोदींनी सांगावे. आरक्षणाची मर्यादा वाढवणारे विधेयक त्यांनी संसदेत आणावे. शिवसेनेचे खासदार त्याला पाठींबा देतील असे ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी इथे भांडत राहण्या पेक्षा सर्वांनी मिळून दिल्लीला जावू , तिथे मोदींना भेटू असेही ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. ठाकरे यांनी आरक्षणाचा चेंडू भाजपाच्या कोर्टात टाकल्यानंतर पक्ष प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.