Ravindra Chavan : औरंगजेबाच्या अनुयायांना शालीनतेवर बोलण्याचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटला चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे उत्तर दिलं आहे.
राहुल गांधींचं ‘सत्यमेव जयते' म्हणजे खोटेपणा, असा टोला लगावला. महाराष्ट्रातील सर्वात शालीन नेता देवेंद्र फडणवीस हे तुमच्या नेत्यांनाही माहिती आहे, असं चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करत सांगितलं की, आणि हे कोण सांगतेय... सातत्याने अनुनयासाठी औरंगजेबाची भलावण करणारी, कौरव आणि रावणांची फौज असलेली काँग्रेस. हर्षवर्धनजी, तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांना तरी विचारले की महाराष्ट्रातील सर्वांत शालीन नेता कोण, तर ते झोपेतही एकच नाव घेतील, आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांचेच.
( नक्की वाचा : CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं )
या चौघांशी बोलण्यात तुम्हाला अडचणी असतील तर सांगा, आम्ही मध्यस्थी करु. बाकी रोज खोटे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या ‘सत्यमेव जयते'चं वास्तव सर्वांनाच ठावूक आहेच.
काय म्हणाले होते सपकाळ?
राज्य सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावातून पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा अध्यादेश काढला होता, असा आरोप सकपाळ यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'नया है वह' असं खोचक उत्तर दिलं होतं.
हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांचा तो व्हिडिओ ट्विट करत हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा, आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा! असा टोला लगावला होता.
आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे. आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण… सत्यमेव जयते! असं ट्विट सपकाळ यांनी केलं होतं, त्याला रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.