BMC Election: 'मुंबईचा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल', पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप निश्चित

BMC Election: राज्यातील सत्तारुढ भारतीय जनता पार्टीनं आगामी निवडणूक जिंकण्याची रणनीती निश्चित केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्याचे संकेत दिले आहेत. 

जाहिरात
Read Time: 4 mins
BMC Elections: कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका एकेकाळच्या मित्राच्या हाती जाऊ द्यायची नाही, असा निर्धार भाजपने केला आहे.
मुंबई:

BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय. या निवडणुका डोळ्यासमोर येऊन उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी राज्यातील सत्तारुढ भारतीय जनता पार्टीनं आगामी निवडणूक जिंकण्याची रणनीती निश्चित केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्याचे संकेत दिले आहेत. 

 मुंबईचा प्रत्येक रस्ता ‘मोहम्मद अली रोड' होईल आणि प्रत्येक वॉर्डातून ‘हारून खान' निवडून येईल, असा प्रचाराचा रोडमॅप भाजपानं निश्चित केलाय. मुंबईचा पुढील महापौर ‘खान' होईल का? असा सवाल भाजपचे नेते अमित साटम यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाचे राजकारण  मतांच्या ध्रुवीकरणावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचा इरादा पक्का

भाजपचा इरादा मुंबई महापालिकेवर ‘महायुती'चा झेंडा फडकवण्याचा आहे. गेल्या वेळी मित्रपक्षासाठी महापालिकेचा त्याग केला होता, पण यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका एकेकाळच्या मित्राच्या हाती जाऊ द्यायची नाही, असा निर्धार भाजपने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' असे वक्तव्य करून भाजपची नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

( नक्की वाचा : PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील )
 

'बटेंगे तो कटेंगे'

भाजपचे राजकारण नेहमीच मतांच्या ध्रुवीकरणाभोवती फिरत आले आहे. 'बटेंगे तो कटेंगे' हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाल्यानंतर तेच ‘ट्रम्प कार्ड' भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीत वापरणार आहे. भाजपाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आपल्या पहिल्या मेळाव्यातच 'तुम्हाला मुंबईचा महापौर खान चालेल का?' असा सवाल विचारून हे संकेत दिले आहेत. साटम यांच्या मते, उद्धव ठाकरे गट 'नवा वर्सोवा पॅटर्न' राबवत आहे, ज्यामुळे प्रत्येक वॉर्डात ‘हारून खान' निवडून येईल आणि मुंबईचा महापौर ‘खान' होईल.

'... चिल्लर लोकांशी बोलत नाही' 

भाजपच्या या ध्रुवीकरणाच्या राजकारणावर उद्धव ठाकरे गटाने फारसे महत्त्व दिलेले नाही. खासदार विनायक राऊत यांनी 'अशा चिल्लर लोकांशी आम्ही बोलत नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर किशोरी पेडणेकर यांनी 'टीका करणं हे भाजपचं कामच आहे' असे म्हटले आहे.गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्याने, विशेषतः मुस्लिम मतांनी उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा दिला.

Advertisement

आकडेवारी काय सांगते ?

  • विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अल्पसंख्याकांची 9% मते मिळाली.
  • भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला.
  • वर्साेव्यातून हारून खान हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार म्हणून निवडून आले आणि गेल्या 25 वर्षांत ठाकरे गटाचा पहिला मुस्लिम आमदार झाला.
  • लोकसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना 86,883 विक्रमी मते मिळाली.
  • दक्षिण मध्य मुंबईतील धारावी आणि अणुशक्तीनगर या मुस्लिम बहुल भागातून अनिल देसाईंना मताधिक्य मिळाले.
  • उत्तर पूर्व मुंबईतील मानखुर्दमध्ये संजय दिना पाटील यांना तब्बल 1,20,000 मते मिळाली.

मुस्लिमांचा ठाकरेंवर विश्वास का?

मुस्लीम समाजाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी माहीम दर्ग्याच्या मौलवींची भेट घेतली होती आणि 'जैसे हमारी दुश्मनी बहोत मशहूर रही, वैसे हमारी दोस्ती मशहूर होगी' असे म्हटले होते. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वावर कट्टर असलेली शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक झाली, असा विश्वास मुस्लिम समाजाला वाटू लागला आहे.

याच विश्वासामुळे भाजपला 'ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली' असा प्रचार करण्यासाठी आयता मुद्दा मिळाला आहे.

( नक्की वाचा : Marathwada Mukti Din हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
 

भाजपाची 'हिंदू मतां'ची रणनीती

भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदू मतांना एकगठ्ठा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाले, मात्र हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले नाही. त्यामुळे उदासीन राहिलेल्या हिंदू मतदारांना सक्रिय करण्याची भाजपची रणनीती आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा दिली होती. त्यांच्या महाराष्ट्रातील 12 सभांपैकी 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागांमध्ये मतदानाची टक्केवारी घटली. 'एक है तो सेफ है' या घोषणेमुळे हिंदू बहुल भागांमध्ये हिंदू मतांची टक्केवारी वाढली.

या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप ‘हिंदू-मुस्लिम' तसेच ‘मराठी-अमराठी' असे ध्रुवीकरण घडवण्याची शक्यता आहे. यातून कोणता पक्ष निवडणुकीत बाजी मारेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.
 

Advertisement
Topics mentioned in this article