Sonia Gandhi on President Droupadi Murmu : संसदेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला आजपासून (31 जानेवारी) सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सत्रासमोर अभिभाषण केलं. या अभिभाषणावर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या सोनिया गांधी?
संसदेच्या परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना Poor Lady (बिचारी महिला) असं म्हंटलं. सोनियाग गांधी यांची ही प्रतिक्रिया अपमानास्पद आहे, अशी टीका भाजपानं केली आहे. एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती बनली हे काँग्रेसच्या संरजामशाही मानसिकतेला अजूनही पचलेलं नाही, अशी टीका भाजपानं केली आहे.
संसदेच्या परिसरात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, 'राष्ट्रपती अभिभाषणाच्या शेवटी खूप थकल्या होत्या. बिचाऱ्या त्या मोठ्याप प्रयत्नानं बोलत होत्या.' सोनिया गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा उपस्थित होते.
भाजपानं दिलं उत्तर
भाजपा नेते संबित पात्रा यांनी सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. 'आज संपूर्ण देशानं राष्ट्रपतींना लक्षपूर्वक ऐकलं. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय दुखद आहे. हे चुकीचं आहे. राष्ट्रपती अभिभाषणाच्या दरम्यान थकल्या होत्या, असं त्या म्हणाल्या. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहे. या देशात राष्ट्रपती सशक्त आहेत.'
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, 'राष्ट्रपतींचा या प्रकराचा अपमान कधीही झालेला नाही. काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींबाबत ज्या पद्धतीचे शब्द वापरले, त्याची मी कल्पनाही करु शकत नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी?'
( नक्की वाचा : Budget 2025 : केंद्रीय बजेटवरही जाणवणार 'ट्रम्प इफेक्ट'! अर्थमंत्री घेऊ शकतात मोठा निर्णय )
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोनिया गांधी यांच्या राष्ट्रपतींवरील वक्तव्यानं नवा वाद सुरु झाला आहे. भाजपाच्या नेत्यांनी या वक्तव्याचा तातडीनं निषेध व्यक्त करत आक्रमक प्रतिक्रिया दिलीय. आता आगमी अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची क्षमता आहे.