चाळीसगाव, मंगेश जोशी
मतदान हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण राहतो त्या ठिकाणी बदल किंवा सुधारणा घडवायचे असल्यास मतदान करणं आणि आपला लोकप्रतिनिधी निवडणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने या दिवसाची सुट्टी साजरी न करता सजगपणे मतदान करणं अपेक्षित आहे. जळगावातील चाळीसगावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात पत्नीचा मृतदेह असताना या कुटुंबाने आपला मतदानाचा हक्क बजावला.
नक्की वाचा - विदर्भात मतदानाच्या दिवशी हिंसक घटना, उमेदवारावर जीवघेणा हल्ला; नागपुरात सर्वात कमी मतदान
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कळमडू गावात मतदानाच्या दिवशीच 40 वर्षीय छायाबाई बच्छे यांचे आकस्मिक निधन झाले. घरात दुःखाचा सावट असतानाही कुटुंबीयांनी छायाबाई यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. छायाबाई यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना छायाबाई यांचे पती राजेंद्र बच्छे त्यांचे भाऊ गुलाब बच्छे कुटुंबातील इतर सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याला प्राधान्य देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छायाबाई यांचा मुलगा गेल्या चार महिन्यापूर्वीच अग्निवीर भरती निवड झाल्याने तो कर्नाटकमधील बेळगाव येथे प्रशिक्षणासाठी आहे. त्यामुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ न शकल्याने मुलीने आपल्या आईला अग्निदान देत अंत्यसंस्कार केला आहे. कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले, त्यामुळे गावात या कुटुंबाचं मोठं कौतुक केलं जात आहे.