Chandrapur News : चंद्रपुरात राजकीय 'ट्विस्ट'! ठाकरे गटाने भाजपासाठी दरवाजे उघडले? काँग्रेसची डोकेदुखी वाढली

Chandrapur Municipal Corporation 2026:  चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Chandrapur News : चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली आहे.
नागपूर:

Chandrapur Municipal Corporation 2026:  चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे. शुक्रवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत आपल्या नवीन गटाची अधिकृत नोंदणी केली. 

या दोन्ही पक्षांच्या नव्या युतीमुळे आता चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची धाकधूक वाढली आहे. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने आता चंद्रपुरात कोण कोणासोबत जाणार, याची चर्चा रंगली आहे.

ठाकरे गट आणि वंचितची हातमिळवणी

चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेत किंगमेकर ठरण्यासाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठाकरे गटाचे 6 आणि वंचितचे 2 असे एकूण 8 नगरसेवक आता एकाच गटात आले आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी या नव्या युतीची घोषणा केली असून, आणखी 2 अपक्ष नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर हे अपक्ष नगरसेवक सोबत आले, तर या गटाचे संख्याबळ 10 वर पोहोचणार आहे. यामुळे 66 सदस्य असलेल्या महानगरपालिकेत हा गट सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Sadan Scam : 20 हजार पानांचे आरोपपत्र तरीही भुजबळ निर्दोष; ED ची केस नेमकी कुठे फसली? वाचा सविस्तर )

काँग्रेससमोर अट

महानगरपालिकेत 30 जागांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र बहुमतासाठी त्यांना अजून काही आकड्यांची गरज आहे. ठाकरे गटाने काँग्रेसकडे आपला प्रस्ताव पाठवला असून त्यांनी महापौरपदाची मागणी केली आहे. संदीप गिरे यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही काँग्रेसला आमची भूमिका कळवली आहे, पण जर काँग्रेसने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर आमच्यासमोर भाजपसह इतर पर्याय खुले आहेत. जो पक्ष आम्हाला आदर देईल आणि महापौरपद देईल, आम्ही त्यांच्याच बाजूने उभे राहू, असा इशारा दिल्याने आता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

भाजपासाठी दरवाजे उघडणार?

चंद्रपूरच्या राजकारणात भाजप हा 23 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट काँग्रेससोबत जाईल अशी शक्यता होती, मात्र आता महापौरपदावरून निर्माण झालेला पेच भाजपच्या फायद्याचा ठरू शकतो. जर काँग्रेसने ठाकरे गटाची अट अमान्य केली, तर ठाकरे गट थेट भाजपशी हातमिळवणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Advertisement

संदीप गिरे यांच्या वक्तव्यामुळे भाजपसाठी ठाकरे गटाचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे चंद्रपुरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

( नक्की वाचा : Davos 2026 : दावोस म्हणजे नक्की काय आणि त्याचा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंध काय? वाचा सविस्तर )
 

नेत्यांच्या वादात तिसऱ्याचा फायदा

निवडणुकीपूर्वी चंद्रपुरात भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकांचे निकाल लागल्यावर काँग्रेसमध्येही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. मोठ्या पक्षांमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा आता ठाकरे गट आणि वंचितची युती घेताना दिसत आहे. 

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे, आता काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही डावलून ठाकरे गट आपला महापौर बसवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

चंद्रपूर महानगरपालिकेचे पक्षीय बलाबल

चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण 66 जागांचे चित्र पाहिले तर कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडे 30, भाजप 23, शिवसेना ठाकरे गट 6, वंचित बहुजन आघाडी 2, शिवसेना 1, बसपा 1, एमआयएम 1 आणि 2 अपक्ष नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 या आकड्याची गरज असून ठाकरे गट आणि वंचितच्या 8 नगरसेवकांचा गट ज्या बाजूला जाईल, त्यांचे पारडे जड होणार आहे.