ओबीसींचा आरक्षणातील वाटा कायम राहावा. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी आता ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं. हाके यांनी दहाव्या दिवशी सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांचं उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं हाके यांची भेट घेतली. यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषण केलं. आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही, असं सांगत भुजबळांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली.
काय म्हणाले भुजबळ?
आम्ही कुणालाही धमक्या देण्याचं काम करत नाही. आम्हाला आमचे दोन वाघ पुन्हा मैदानात हवे आहेत, असं भुजबळांनी सुरुवातीला स्पष्ट केलं. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. लोकशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. मराठा समाजाला तुम्ही वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातालं आरक्षण आम्हाला राहू द्या, अशी मागणी भुजबळांनी केली.
. काही लोकं आपली औकात विसरलेत. औकातीमध्ये राहा बेट्याहो,आम्ही शांत बसलो आहोत, याचा अर्थ आम्ही गरीब नाही, असा इशारा त्यांनी दिला.
तुम्ही कोणत्या पक्षात आहेत मला काही घेणं देणं नाही.दलित,आदिवासी समाज तुमच्यासोबत आहेत. हातावर हात धरुन बसला तर काहीही होणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटले. आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रमक नाही. खोटे दाखले पुन्हा एकदा तपासण्यात येणार आहे. पूर्वीचे जे नियम आहेत, ते सुप्रीम कोर्टाचे आहेत. मराठा समाजाल ज्या योजना लागू आहेत, त्या आम्हालाही द्या, अशी मागणी भुजबळांनी यावेळी केली.
( नक्की वाचा : लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा )
जरांगे काय बोलतो हे सुद्धा त्याला कळत नाही. जरांगे पाटलांनी हाके यांच्यासोबत चर्चा करावी.आपआपासात लढात तर आपलं भविष्य काळोखात जाईल, असा इशारा भुजबळांनी त्यांच्या समर्थकांना दिला. ओबीसींना प्रमाणपत्रासाठी 10 दिवस लागतात.ओबीसी नेत्यांच्या बैठकीत अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. अधिवेशन काळात इतर मागण्यांवर चर्चा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
... तर राजकीय आरक्षण मागावं लागेल
बीड लोकसभा निवडणुकीची लढाई यंदा चांगलीच गाजली. भुजबळांनी या भाषणात बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाचा देखील मुद्दा उपस्थित केला. पंकजाताईंनी समाजात तेढ नको म्हणून कोणाला विरोध केला नाही. तरीही काही लोकांनी त्यांना विरोध केला.सगळ्यांनी मिळून त्यांच्या पराभवाचे कारस्थान रचले.आम्ही लोकसभेवर जायचे नाही,विधानसभेवर जायचे नाही.अधिकारक्षेत्रात तुमचे 10-20 जण आणि आमचा एकही नको. असंच जर चालू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल, असा इशारा भुजबळांनी दिला.