छगन भुजबळांनी लिहीलं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, विषय काय?

भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने सध्या नाराज आहे. त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशनाकडेही पाठ फिरवली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नाशिक:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने सध्या नाराज आहे. त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशनाकडेही पाठ फिरवली आहे. त्यात त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.तर महाराष्ट्रातील कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकतो. तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत 60 टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. राज्यातील  शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी व जिव्हाळयाचे पिक आहे. कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असल्याने नेहमीच त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात. वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्हयातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे.  वास्तविक जागतिक बाजारपेठांमध्ये कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी सरकारने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले आहेत.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आई अन् मुलगा लाइफ जॅकेटसाठी बोटीच्या खाली गेले, पण..; मुंबई बोट अपघाताचं धक्कादायक वास्तव

येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये कांदा निर्यात केली जाते. सद्याच्या स्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले आहे. लाल कांदा बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याने अत्यंत कमी दराने त्यांचे उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात सापडले आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक अधिक वाढल्याने सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची विक्री होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - नोकरीसाठी दुबईला गेली पण थेट पाकिस्तानात पोहोचली, तब्बल 23 वर्षानंतर जे घडलं ते...

बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आधीच मोठा फटका बसला आहे. तसेच उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यातून अडचणींना सामोरे जावे लागते. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. परंतु भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिमाण हा कांदा निर्यातीवर होत असून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 7 वर्षाच्या मुलीला बेदम मारलं, गळा आवळला, खड्ड्यात फेकलं, पण तिनं जे केलं...

लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.