मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधारी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात भाषण करताना फडणवीस यांनी ही ऑफर दिली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सभागृहात उपस्थित होते.
काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात उद्धव ठाकरेंना ऑफर देताना म्हंटलं की, '2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे.' फडणवीस यांनी भर सभागृहात ही ऑफर दिल्यानं नवी चर्चा सुरु झाली आहे.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्यानंतर उद्धव ठाकरेचं सभागृहात भाषण झालं. त्या भाषणात ठाकरे यांनी या वक्तव्यावर काहीही बोलणं टाळलं. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य )
भाजपा- ठाकरे जुने मित्र
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची राज्यात तब्बल 25 वर्षांपेक्षा जास्त युती होती. भाजपा नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या युतीचे शिल्पकार होते. या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतरही ही युती कायम होती.
पण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर ही युती तुटली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात बंड केलं. एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी ताणले गेले.
भाजपा प्रदेशाध्यक्षांचेही संकेत
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी 'NDTV मराठी' शी बोलताना उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी दाखवली होती. अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहितचीा विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी या मुलाखतीमध्ये केलं होतं. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना थेट ऑफर दिल्यानं चर्चेचा उधाण आलं आहे.