धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात सतीश भोसले उर्फ खोक्या हा चर्चेत आला होता. हा खोक्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे असं ही सांगितलं जात आहे. त्याच्या एकामागून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कधी तो पैशांबरोबर खेळताना दिसत होता, तर कधी शिकार करताना दिसत होता. मारामारीचे व्हिडीओ ही त्याबरोबरीला होतेच. त्या खोक्याच्या मुसक्या पोलीसांनी प्रयागराज इथं जावून आवळल्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलकी प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय त्यातून एक प्रकारे इशाराही दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सतीश भोसले उर्फ खोक्या याला बुधवारी प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे सतीश भोसलेची बीडमधून हद्दपारी निश्चित झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - Abu Azmi News: 'नमाजसाठी बाहेर पडा, अंगावर रंग टाकला तर...' अबू आझमींचे थेट आवाहन
यावर बोलताना फडणवीसांनी थेट इशाराच दिला आहे. खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कुणालाच सोडणार नाही, सर्वांनाच ठोकून काढणार असं फडणवीसांनी सांगितलं आहे. ज्यावेळी खोक्याला अटक झाली त्यावेळी खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहीजे असं ट्वीट अजय मुंडे यांनी केले होते. अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मात्र कुणालाच सोडणार नाही असा इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता. या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर त्याच्यावर शिरूर, चकलांबा पोलीस ठाण्यासह तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केलेला होता. दरम्यान त्याचे वन विभागाच्या जागेवर असलेले घरही वन विभागाने जमीनदोस्त केले आहे.