राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वपक्षीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. रविवारी डोंबिवली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक महायुतीच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. एकनाथ शिंदेंनी या भाषणात आपल्या नेहमीच्या शैलीत विकासकामांचा पाढा वाचत उद्धव-आदित्य ठाकरे पिता-पुत्रांना टोले लगावले.
मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं कौतुक -
आजच्या कार्यक्रमात हजर राहताना मी तिहेरी भूमिकेत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा मुख्यमंत्री, महायुतीमधील शिवसेना पक्षाचा प्रमुख नेता आणि खासदाराचा बाप या तिहेरी भूमिकेत मी उभा आहे. श्रीकांत शिंदे यांनी केलंलं काम आणि त्याचं होणारं कौतुक पाहता बाप म्हणून मला खरंच आनंद होत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
अवश्य वाचा - 'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय'; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका
श्रीकांत शिंदे हे एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नेते आहेत. त्यांच्या रुपाने तुम्ही आदर्श लोकप्रतिनीधी लोकसभेत पाठवल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. इथली लोकंही मला सांगतात की फिर एक बार श्रीकांत शिंदे खासदार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं. याचवेळी श्रीकांत खासदार असला तरीही तो लहानच आहे, त्याचं काही चुकलं तर कान धरण्याचा अधिकार तुम्हाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचा पाढा आणि ठाकरेंवर टीका -
यापुढे भाषणात बोलत असताना एकनाथ शिंदेंनी महायुती सरकारमध्ये आपण घेतलेल्या निर्णयांची माहिती देत हे सरकार सामान्य जनेत्या भल्यासाठी असल्याचं सांगितलं. राज्याचे प्रश्न घेऊन प्रत्येकाला दिल्लीत जावंच लागतं असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. तसेच काही अहंकारी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी राज्याचं नुकसान केल्याचं म्हणत शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
इथला रिंगमास्टर मीच !
यापुढील भाषणामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता-पुत्रांवरही निशाणा साधला. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत नकली वाघ येऊन डरकाळ्या फोडून गेले. पण इथला रिंगमास्टर हा मीच आहे. वाघाचं कातडं पांघरलं की शेळ्या वाघ होत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.