भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाचं 24 वं राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तामिळनाडूमधील मदुराईमध्ये झाले. या अधिवेशनात पक्षानं एमए बेबी या नावानं ओळखले जाणारे मरियम अलेक्झँडर बेबी यांची पक्षानं सरचिटणीसपदी निवड केली. सीताराम येचुरी यांचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. त्यानंतर हे पद रिकामे होते. माकपनं आजरवच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रांतीकारी निर्णय घेत अल्पसंख्याक व्यक्तीची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत बेबी?
बेबी यांचा जन्म पाच एप्रिल 1954 रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील प्रक्लुममध्ये झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण प्रक्लुममध्ये झाले. त्यांनी एसएन कॉलेजमधून राज्यशास्त्राच्या पदवीचं शिक्षण घेतलं. पण, ते अंतिम परीक्षा देऊ शकले नाहीत. बेबी विद्यार्थीदशेमध्येच केरळ स्टुडंट्स फेडरेशनमध्ये सहभागी झाले. याच संघटनेचे पुढं स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) मध्ये रुपांतर झाले. बेबी यांना आणिबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती. ते 1986 ते 98 या काळात राज्यसभा खासदार होते. वयाच्या 32 व्या वर्षीच त्यांची राज्यसभा खासदार म्हणून पक्षानं निवड केली होती.
केरळमधील व्हीएस अच्युतानंदन यांच्या (2006 ते 2011) सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. माकपनं 2012 साली त्यांना पॉलिट ब्युरो या सर्वोच्च संस्थेचा सदस्य म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या पत्नी बेट्टी लुईस यांनी देखील केरळ एसएफआयचं काम केलं आहे. त्यांना एक मुलगा असून अशोक बेट्टी नेल्सन असं त्यांचं नाव आहे.
( नक्की वाचा : 'बड़े शहरों में ऐसा होता रहता है', महिलेच्या छेडछाड प्रकरणात गृहमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य )
दुसरा कार्यकाळ नाही
एमए बेबी हे माकप सरचिटणीस झालेले केरळचे दुसरे नेते आहेत. यापूर्वी केरळमधील ईएमएस नंबूदरीपाद दोन टर्म सरचिटणीस होते. प्रकाश करात देखील केरळचे आहेत. पण ते दिल्ली शाखेशी संबंधित आहेत. बेबी यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. त्यांना दुसरा कार्यकाळ मिळण्याची शक्यता नाही. बेबी शनिवारी 71 वर्षांचे झाले. याचा अर्थ हा कार्यकाळ संपल्यानंतर ते 74 वर्षांचे होतील. पक्षाच्या राज्यघटनेनुसार कोणताही नेता 75 वर्षांपर्यंतच पॉलिट ब्युरोमध्ये राहू शकतो. त्यामुळे बेबी यांना दुसरा कार्यकाळ मिळणार नाही.
नव्या चेहऱ्यांचा समावेश
मदुराई अधिवेशनात माकपानं 84 सदस्यांच्या केंद्रीय समितीची निवड केली आहे. त्यामध्ये 30 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय समितीनं 18 सदस्यांच्या पॉलिट ब्युरोची निवड केली. त्यामध्ये आठ नवे सदस्य आहेत. याच पॉलिट ब्युरोमधून सरचिटणीसची निवड करण्यात आली.
बंगाल विरुद्ध केरळ
माकपमधील बंगाल गटाचा ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांना सरचिटणीस करण्याचा प्रयत्न होता. पण, केरळ लॉबीनं बेबी यांच्या नावावर सहमती मिळवण्यास यश मिळवलं. सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर बेबी यांनी सांगितलं की, 'पक्षाच्या शक्तीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे माकपाच्या प्रत्येक सदस्याला एकत्र येण्याची गरज आहे. फक्त माझ्यासमोर आव्हान नाही. पक्षाचे 10 लाख सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे. पॉलिट ब्युरोचे सर्व सदस्य, केंद्रीय समिती आणि लाखो सदस्यांच्या मदतीनं आम्ही सामूहिक पद्धतीनं निर्णयाची अंंमलबजावणी करणार आहोत.'