काँग्रेसचे अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री हे एकमागून एक सध्या पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्यात आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. म्हेत्रे हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांनी मोठी मदत केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत म्हेत्रे यांना पराभव स्विकारावा लागला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिद्धराम म्हेत्रे यांनी अनेक वर्ष अक्कलकोट मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. काँग्रेसचे ते आमदार राहीले आहेत. शिवाय त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री म्हणून ही काम केलं आहे. अनेक वर्षांपासून म्हेत्रे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र त्यांनी आता काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते येत्या 31 में ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अक्कलकोटमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढणार आहे.
सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे ही उपस्थित होते. तिथेच त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद या प्रवेशाने वाढणार आहे. पण त्यांचे कट्टर विरोधक आणि अक्कलकोटचे विद्यमान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी मात्र या प्रवेशामुळे काहीशे अस्वस्थ आहेत.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचं महायुती आपण स्वागत करतो असं कल्याणशेट्टी म्हणाले. काँग्रेस सत्तेपासून बरीच लांब गेली आहे. त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे. म्हेत्रे यांनी हिंदुत्व विचाराचा विरोध केला होता. आता त्यांनी हिंदुत्व विचारसरणी स्वीकारली असेल तर त्याचे आपण स्वागत करतो असे ही ते म्हणाले. म्हेत्रे यांनी फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचं अस्तित्व राहिले नाही. त्यांनी हा निर्णय घेताना लोकांना सांगायला पाहिजे होतं. असं ही ते यावेळी म्हणाले.