आपला पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा असा अजब सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवाय गेल्या काही दिवसात काँग्रेसचे अनेक नेते, माजी आमदार यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. हे नेते पक्ष का सोडत आहेत याचे कारण त्यांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांच्यावर निशाणा ही साधण्याची संधी त्यांनी सोडली नाही. ते परभणीत काँग्रेसच्या सद्भावना यात्रेसाठी आले होते त्यावेळी बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनेकांनी पक्ष सोडला आहे हे खरे आहे, असं सकपाळ म्हणाले. पण भाजपमध्ये जे लोक जात आहेत ते विचारधारेसाठी नाही तर फक्त आणि फक्त सत्तेसाठी जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा असं विधान केल्यावर, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की भाजप हे काँग्रेसचं नेतृत्व खाणारी चेटकीण आहे. हे आम्ही केलेलं विधान त्यांनी अधोरेखित केलं असून ते खरच आहे. भाजपाकडे त्यांचे कार्यकर्ते नाहीत. स्वतःच्या हिंमतीवर निवडून यायची त्यांची धमक नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात आधीच काँग्रेचे नेते आहेत. ते काँग्रेस फोडण्याचं बोलत आहेत. त्यामुळे ते किती कमजोर आहेत हे समजत आहे असं ते म्हणाले.
बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असं विधान काही दिवसापूर्वी नागपूरला केलं होतं. त्यावर निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्यांचा विश्वास नाही, लोकांना ते गृहीत धरतात, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्यांनी हॅक केली आहे, तर EVM देखील हॅक केलेली आहे, असं खळबळजनक विधान सपकाळ यांनी केलं आहे. काँग्रेस पक्ष संविधान मानणारा आहे. मनूवादाली तिथे थारा नाही. त्यामुळे मनुवादी बनायचं की संविधानवादी बनायचं हे आपल्याला ठरवायचं आहे असं ही त्यांनी यावेळी सांगिलय. महायुतीत कशी कुरूबुरी सुरू आहे याचा उल्लेख ही त्यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी जाती निहाय जनगणना करुन घेणारच हे राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सरकारला ते करण्यास भाग पाडलं आहे असं ही सकपाळ यावेळी म्हणाले. याचा थेट फायदा मराठा समाजाला होईल. त्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. शिवाय ओबीसींची संख्या समजल्यास त्यांच्या आरक्षणाचा कोटाही वाढण्यास मदत होणार आहे असं ही ते यावेळी म्हणाले. दरम्यान भाजप आणि आरएसएस हे दंगली कशा भडकवल्या जातील याचाच विचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला.