संजय तिवारी, प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसची आजवर झालेली ही सर्वात खराब कामगिरी आहे. या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटत आहेत. नाना पटोले यांनी या पराभवाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची सध्या चर्चा सुरु होती. विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वी नाना पटोले यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर पक्षाच्या पराभवाबाबतही खुलासा केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजीनामा दिला का?
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मी राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. मला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. हा पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. त्यावर उघड चर्चा करण्याचं कारण नाही. तुम्हाला संघटनात्मक निर्णय कळतील, असं नाना यांनी सांगितलं.
काँग्रेसचे राज्यात फक्त 16 आमदार निवडून आले आहेत. राज्यात काँग्रेस इतकी खाली आली नाही, हे विजय वडेट्टीवार म्हणाले ते खरं आहे. जनता या धक्क्यातून बाहेर आलेली नाही, असं नानांनी सांगितलं. त्याचबरोबर तिकीट वाटपांपासून सर्व गोष्टींमध्ये सर्वजण सहभागी झाले आहेत. ही सामूहिक जबाबदारी आहे. पक्ष नेतृत्वानं सर्व गोष्टी टेक ओव्हर केल्या होत्या, असं सांगत नानांनी खराब कामगिरीबाबत सर्वच प्रमुख नेत्यांकडं बोट दाखवलं आहे.
( नक्की वाचा : Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट )
नाना पटोले विधीमंडळ पक्षाचे नेते होणार अशी चर्चा आहे. त्यावर या प्रकारची चर्चा कुणीही करु शकतो. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असं नाना यांनी सांगितलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी ही जनतेची भावना असल्याचा दावा त्यांनी केला.
परभणीध्ये दलितांना जनावरापेक्षा जास्त वाईट वागणूक मिळाली आहे. इतकी बेदम मारहाण करण्याचे कारण नाही, मी याचा निषेध करतो, असं नानांनी सांगितलं. पोलीस अधिक्षकांचं निलंबन केलं जावं. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात फक्त 3 लोकांचं सरकार सुरु आहे. मलईसाठी भांडण सुरु आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.