संजय तिवारी, प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राज्यात नंबर 1 पक्ष बनलेल्या काँग्रेसचा विधानसभेत मोठा पराभव झाला. राज्यात 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांचा मतदारसंघ राखण्यात दमछाक झाली. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतील नाना पटोले अवघ्या 208 मतांनी निवडून आले. या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र आता पुन्हा व्हायरल झालंय. त्यामुळे शुक्रवारी (13 डिसेंबर) नाना कुठे आहेत? असा प्रश्न बहुतेक पक्ष कार्यकर्त्यांना पडला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुठे आहेत नाना?
नाना पटोलेंच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले त्यांच्या साकोली मतदारसंघात होते. नाना यांनी मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या. पण, त्यांनी बाहेरच्या व्यक्तींना आणि पत्रकारांना भेटण्याचं टाळलं.
नानांच्या निकटवर्तीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना यापुढे अधिकाधिक काळ मतदारसंघात राहण्याची इच्छा आहे. ते विधानसभा अधिवेशनात पूर्णवेळ असतील. त्या काळात जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याचा तसंच सरकारला धारेवर धरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण, प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याचा आदेश पक्षश्रेष्ठींकडून आला तर तर नानांच्या काही अटी असतील.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
नानांच्या मनात काय?
नाना पटोले सध्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. मी त्यापेक्षा मतदारसंघात राहीन. लोकांची कामं करीन, गावातील शेती पाहीन, अशी त्यांची मनस्थिती असल्याची माहिती नानांच्या निकटवर्तींयांनी दिलीय.
विधानसभा निवडणुकीत 208 मतांनी मिळालेला विजय नानांच्या जिव्हारी लागलाय. आगामी काळात मतदारसंघात अधिक वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. स्थानिक कामांचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थिती राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, अशी माहिती नानांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )
नाना पटोलेंचा राजीनामा सध्या काँग्रेस हायकमांडनी स्विकारलेला नाही. त्यांना पक्षश्रेष्ठींनी पुढील प्रदेशाध्यक्ष निश्चित होईपर्यंत जबाबदारी सांभळण्याचे मोघम निर्देश दिले आहेत. नानांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीत पराभवाची जबाबदारी नानांची एकट्याची नसून ती सामूहिक असल्याचं नानांना सांगण्यात आलं, अशी माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत एक खासदारावरून 13 वर गेलो हा विजय सामूहिक होता तसाच हा पराभव देखील सामूहिक आहे, या शब्दांत त्यांना समजावले आहे.
नाना पटोलेंच्या अटी काय?
पक्षांतर्गत राजकारण नको
पक्षांतर्गत महत्वाकांक्षी नेत्यांनी विरोधकांची भूमिका घेतली आहे आणि त्यांना दिल्लीतील काही नेते समर्थन करताहेत, ही नानांची जुनी तक्रार आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. बंटी शेळके हे ताजे उदाहरण आहे. नाना पटोले वैयक्तिक पातळीवर बंटी शेळके यांना फारसे महत्त्व देत नाहीत. मात्र शेळके यांनी सार्वजनिकपणे प्रदेश अध्यक्षाला उद्देशून आरोप केले होते. बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. मात्र, प्रदेश काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी दिल्लीकडून मिळालेली नाही. उलट काँग्रेसमधील नाना पटोले यांच्या विरोधकांतर्फे आपल्या कार्यक्रमात बंटी शेळके यांना मानाचे स्थान देण्यात येत आहे.
नाना पटोले यांनी उघडपणे EVM बाबत आमची तक्रार नसून निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराच्या विरोधात आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्याचवेळी रविवारी नागपूरमध्ये काँग्रेसकडून EVM विरोधात आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह बंटी शेळके यांचाही फोटो आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख नाही.
( नक्की वाचा : महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर )
मुंबई आणि दिल्लीमध्ये समन्वय हवा
महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याची तक्रार दिल्लीला कुणीही केली तरी त्यावर कित्येक वेळा संबंधित नेत्याचे स्पष्टीकरण मागवण्यात येत नाही, त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही, अशी नानांची तक्रार आहे.
महाराष्ट्रातून कोणीही नेता दिल्लीला जाऊन पत्रपरिषद घेतो आणि प्रदेश कमिटीला माहिती नसते, साधी सूचना नसते. हे प्रकार घडू नयेत. प्रदेश काँग्रेस कमिटी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये पत्रकारपरिषद झाली पाहिजे. त्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर अधिक सुसूत्रता हवी, अशी नानांची मागणी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world