'महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे', OBC नेते लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

OBC Leader Laxman Hake : 'महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे,' असा आरोप हाके यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

OBC Leader Laxman Hake : मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिलीय. मराठ्यांना सगेसोऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रश्नावर उपोषणही केलं होतं. त्यानंतर सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारसोबत बैठक घेत त्यांच्या मागण्या सादर केल्या. मनोज जरांगे यांनी दिलेली डेडलाईन जवळ आली असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. 'महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे,' असा आरोप हाके यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'सरकार आणि विरोधी पक्ष पळ काढत आहेत'

लक्ष्मण हाके यांनी या मुलाखतीमध्ये राज्य सरकारसोबतच विरोधी पक्षांवरही टीका केली. 'सरकार आणि विरोधीपक्ष वस्तूस्थितीपासून पळ काढत आहेत. ओबीसीसाठींचा राजकीय एप्रोच चुकतोय. त्यामुळे मराठा समाजाची झुंडशाही सुरु आहे. सरकारच्या निर्णयानंतर मराठा आणि ओबीसी एक झाले तर मागसालेपणाचे काय करायचे? मराठा समाज कोणत्या सेक्टरमध्ये मागसलेला आहे. त्यांच्या लोकसंख्येच्या पाचपट प्रतिनिधित्व त्यांना मिळतं,' असा आरोप हाके यांनी केला.

'मराठा समाज मागसलेला असेल तर कोणता समाज पुढारलेला आहे? राजकीय पक्ष निवडणुकांना घाबरतात. महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे. सरकार टेबल लावून मराठा - कुणबी नोंदी करत आहे. हा फ्रॉड नाही का? कुणबी नोंदी असतील तर ठीक आहे, पण कुणबीच्या मागे म लागला असेल तर आमचा विरोध आहे,' असं हाके यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : जरांगेंच्या शक्तीप्रदर्शनासाठी बीड सज्ज ! कोणती भूमिका जाहीर करणार? )
 

.... तर चलो मुंबईचा नारा

'सगेसोयरेचा आदेश आला तर अख्ये गाव ओबीसीमध्ये येईल. हा अध्यादेश आला तर आम्ही चलो मुंबईचा नारा देवू. सरकार बेकायदेशीरपणे वागत आहे. जे होणार नाही ते देण्याचं आश्वासन करत आहे. त्यामुळे सरकारकडून आमची अपेक्षा आहे. आम्ही जनतेसमोर न्याय मागू. सरकारपेक्षा मुख्यमंत्री कसा आहे हे महत्त्वाचं असतं. 

आम्ही महाविकास आघाडीच्या फायद्यापेक्षा ओबीसीला कोण टिकवेल त्यांना ताकद देवू. जरांगेंना शांतता रॅली का काढावी लागते. बीडमध्ये जाळपोळ कुणी केली? असा सवाल करत शांतता रॅली काढायची आणि अशांतता निर्माण केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही रॅलीला रॅलीनं उत्तर देणार नाही. मी येत्या सोमवारपासून गावोगावी जाणार आहे. त्यावेळी रॅली निघेलच. आम्ही राजकीय लढाईपेक्षा कायदेशीर लढाई लढू, असा इशारा हाके यांनी दिलाय.