जाहिरात

जरांगेंच्या शक्तीप्रदर्शनासाठी बीड सज्ज ! कोणती भूमिका जाहीर करणार?

Manoj Jarange Beed Rally : मनोज जरांगे यांच्या सभेसाठी बीडमध्ये जय्यत तयारी सुरु असून ते या सभेत कोणती भूमिका जाहीर करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

जरांगेंच्या शक्तीप्रदर्शनासाठी बीड सज्ज ! कोणती भूमिका जाहीर करणार?
Manoj Jarange Patil Rally
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Manoj Jarange Beed Rally :  मराठा समाजाला सगेसोयरेंसह आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. जरांगे यांनी दिलेली मुदत संपण्यास आता काही दिवसांचा कालावधी उरला आहे. या प्रकरणावर ओबीसी समाज आक्रमक आहे. तर राज्य सरकार तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न करतंय. त्याचवेळी मनोज जरांगे यांनी देखील मराठवाडा पिंजून काढण्यास सुरुवात केलीय. जरांगे यांची उद्या (गुरुवार, 11 जुलै) बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी बीडमध्ये जय्यत तयारी सुरु असून ते या सभेत कोणती भूमिका जाहीर करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मराठा आरक्षण आणि बीड

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये बीड जिल्हा हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी या आंदोलनाचे बीडमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक ठरला. बीडची संपूर्ण लोकसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली. पंकजा मुंडे यांच्या पराभवात जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही या विजयाचं श्रेय मनोज जरांगे यांना दिलं. या सर्व पार्श्वभूमीवर बीडमधील जरांगे पाटील यांच्या सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

( नक्की वाचा : 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा )

सभेसाठी जय्यत तयारी

मनोज जरांगे यांच्या बीडमध्ये होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. गावोगावी अक्षदा वाटप करुन या रॅलीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या रॅलीत येणाऱ्या समाज बांधवांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.सकाळी 11 वा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, सुभाष रोड,साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रॅलीचां मार्ग असून यानंतर ते संवाद सभेला संबोधित करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात संवाद सभेसाठी वीस फूट उंचीचे व्यासपीठ उभारले जात आहे. ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचे बॅनर्स,स्वागत कमानी याबरोबरच भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. रॅलीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

( नक्की वाचा : धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं, विधानसभा निवडणुकीसाठी 'या' उमेदवाराची एन्ट्री )

मांजरसुंबा ते बीडपर्यंत  जरांगे यांचे स्वागत करण्यात येणार आहे बीड मध्ये उद्या 5 लाखांपेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव जमा होणार असल्याचा दावा संयोजकांनी केलाय. या निमित्तानं संपूर्ण बीड शहर जरांगेमय करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. य संवाद रॅलीसाठी बीडमधील वाहतुकीमध्येही बदल करण्यात आलाय.

कशी असेल पार्किंग व्यवस्था?

गेवराई, माजलगावमधून सभेसाठी येणाऱ्यांसाठी शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स परिसर,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसर,रिलायंस पेट्रोल पंप परिसर,मिनी बायपास परिसर याठिकाणी पार्किंग व्यवस्था असणार आहे.

परळी, माजलगाव, धारूर,वडवणी, अंबाजोगई,केज,बीड येथून येणाऱ्यांसाठी शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे,बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर,माने कॉम्प्लेक्स परिसर,निळकंठेश्वर मंदिर परिसर,कनकालेश्वर मंदिर परिसर,बिंदुसरा नदी पात्र परिसर,खंडेश्वरी मंदिर आणि एम.आय.डी.सी.परिसर, फटाका मैदान, मोडा रोड परिसर अशी पार्किंग व्यवस्था असेल. आष्टी पाटोदा शिरूर या भागातून येणाऱ्यांसाठी शासकीय आय.टी.आय. परिसर जुनी आणि नवी पंचायत समिती परिसर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड परिसर भागात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com