
‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज' पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शिवाय तुकाराम महाराजांच्या ओळी सांगत त्यांनी विरोधकांना चिमटे ही काढले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहिणींचा,लाडक्या भावांचा आहे असं मी मानतो असं शिंदे म्हणाले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे असं ही त्यांनी सांगितलं.
या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला कॉमन मॅनला सुपरमॅन करण्यासाठी आणखी बळ मिळो अशी प्रार्थना मी करतो असे ते म्हणाले. नंतर त्यांनी ‘भले दरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' या तुकाराम महाराजांच्या ओळी मला खूप प्रिय आहेत असं सांगत विरोधकांकडे कटाक्ष टाकला. शिवाय एखाद्याने जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून द्यायची, आणि एखाद्याने दगाफटका केला तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच तुकाराम महाराजांची शिकवण मी आयुष्यभर जपली आणि पाळली असं सांगत त्यांनी विरोधकांनाही एक प्रकारे इशारा दिला.
ट्रेंडिंग बातमी - Avhad vs Rane: राजापूर वाद ते हलाल झटका! आव्हाड- राणेंमध्ये उडला विधानसभेत खटका
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी वारकरी संप्रदायासाठी काही भरीव गोष्टी करु शकलो असं त्यांनी सांगितलं. वारकरी बंधूंचा विचार करुन इतिहासात प्रथमच आमच्या काळात वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिलं गेलं, वारकरी विमाछत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला. वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचे कामही मार्गी लागले असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. विठूरायाच्या दर्शन रांगांसाठी आपण तात्काळ निधी दिला. मंदिर हेच संस्काराचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळेच ब कॅटेगरीतल्या तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपण दोन कोटीवरून थेट पाच कोटी केला असं ही ते म्हणाले.
पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो, असे ते म्हणाले. मदत म्हणजे काही उपकार नव्हेत, कारण वारकरी संप्रदायाचे या समाजावरील उपकार कोणी सात जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही. संत तुकाराम महाराज यांच्या,‘शुद्धबीजा पोटीं, फळें रसाळ गोमटीं या वाक्याचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीच्या सरकारच्या विचारांचे बीज शुद्ध आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताची, विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world