पाच वेळा आमदार असलेल्या भावाच्या मतदार संघावर बहिणीचा दावा, पक्षाकडे मागितली उमेदवारी

एक मतदार संघ असा आहे ज्या मतदार संघावर भावा बरोबरच बहिणीनेही दावा केला आहे. त्यामुळे पक्षा समोर मात्र पेच निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
वर्धा:

विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. अनेकांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्जही केले आहेत. मतदार संघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. पण एक मतदार संघ असा आहे ज्या मतदार संघावर भावा बरोबरच बहिणीनेही दावा केला आहे. त्यामुळे पक्षा समोर मात्र पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भावाने या मतदार संघातून जवळपास पाच वेळी प्रतिनिधीत्व करत आमदार झाला आहे. शिवाय राज्यमंत्रीमंडळात मंत्रिपदही भूषवलं आहे. अशा वेळी उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पक्षा समोर पडला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा पेच निर्माण झाला आहे तो वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघात. या मतदार संघात सध्या काँग्रेसचे रणजित कांबळे हे आमदार आहेत. याच मतदार संघातून काँग्रेसच्या चारूलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे. चारूलता टोकस या रणजीत कांबळे यांच्या मावस बहीण आहेत. आपल्याला या मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यांनी उमेदवारी मागितली असल्याचे ही चांदूरकर यांनी स्पष्ट केले आहे. चारूलता टोकस या सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी स्विकारली होती. शिवाय वर्धा लोकसभा मतदार संघाची निवडणूकही त्यांनी 2019 साली लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.   

ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?

तर रणजित कांबळेही या मतदार संघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 1999 पासून ते सतत या मतदार संघातून विजयी होत आहेत. सलग पाच वेळा निवडून येण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. ते आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्रीही राहीले आहेत. सरपंच पदानंतर थेट आमदार होण्याचा मान रणजित कांबळे यांना मिळाला होता. मोदी लाटेत काँग्रेसचे दिग्गज पराभूत झाले असताना कांबळे यांनी हा गड राखला होता. 2014 च्या निवडणूकीत त्यांना 900 मतांचा निसटता विजय मिळाला होता. मात्र पुढच्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. महाविकास आघाडीचे सरकारही आले. मात्र यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. 1999 ते 2019 पर्यंत सलग पाच निवडणूका त्यांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे बहीणीसाठी भावाचा पत्ता कट करताना काँग्रेस पुढे अडचण निर्माण होणार आहे.     

ट्रेंडिंग बातमी - अजित पवार म्हणतात मीच साहेब, कोल्हे म्हणाले राज्यात फक्त 2 साहेब, एक बाळासाहेब दुसरे...

देवळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या प्रभा राव यांचा मतदार संघ आहे. त्या याच मतदार संघात एक अपवाद वगळता सतत निवडून आल्या आहेत. 1990 साली त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र 1995 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी हा मतदार संघ आपला नात्याने भाचा असलेल्या रणजित कांबळे यांना दिला. 1999 ची निवडणूक ही रणजीत कांबळे यांनी लढवली होती. तेव्हा पासून आतापर्यंत हा मतदार संघ कांबळे यांनी काँग्रेसच्या हातून जावू दिलेला नाही.