'आम्ही मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण नंतर...' देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सर्व इतिहास

Devendra Fadnavis on Maratha Reservation : मराठा आरक्षण हा राज्याच्या राजकारणील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Devendra Fadnavis on Maratha Reservation : मराठा आरक्षण हा राज्याच्या राजकारणील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या विषयावर आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. विरोधकांनीही या विषयावर आक्रमक भूमिका घेत सरकारच्या भूमिकेवर टीका केलीय. या सर्व प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा इतिहास सांगितला.  अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्तानं नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अण्णासाहेबा पाटील यांनी बलिदान दिलं.

मराठा समाज हा स्वराज्याचं रक्षण करणारा, गावगाड्याचं नेतृत्त्व करणारा आहे. या समाजाला अडचणीत आणण्याचं काम झालं आहे. त्यावेळी या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नोकरी आणि शिक्षणामध्ये समाज पुढं गेला पाहिजे. त्यासाठी आर्थिक निकषावर मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी अण्णासाहेब पाटील यांनी केली. दुर्दैवाने त्यांची मागणी मान्य झाली नाही. त्याकडं दुर्लक्ष झालं. 

अण्णासाहेब पाटील अतिशय व्याकूळ झाले. मराठा समाजाला न्याय देऊ शकत नसेल तर आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही, असा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी मराठा समाजाला बलिदान दिलं. आज मराठा समाजाची जी चळवळ उभी झाली ती अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे झाली,' असं फडणवीस यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : जरांगे पाटलांकडून सतत होत असलेल्या हल्ल्यावर फडणवीसांनी सोडलं मौन! )
 

आम्ही आरक्षण दिलं

आजही अनेक अडचणी आहेत. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात टिकलेलं हे देशातील एकमेव आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण होतं. मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयातही टिकलं. दुर्दैवाने ते नंतर टिकू शकलं नाही.  पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली 10 टक्के आरक्षण दिलं. मोदी सरकारनं EWS च्या माध्यमातून आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता. पण, सातत्यानं वेगळ्या आरक्षणाची मागणी होत होती.  

आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. या मागण्या चूक आहेत, असं मी म्हणणार नाही. आपण करतोय ती कोणतीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे ही एकच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अन्यथा आपण एक निर्णय घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो न्यायालयानं रद्द करायचा, हे वारंवार व्हायचं अशा प्रकारची फरफट मराठा समाजाची होता कामा नये. या मागण्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

( नक्की वाचा : '... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य )
 

... महाराष्ट्राला भूषणवाह नाही

मराठा समाजानं सातत्यानं विविध समाजाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगड जातीचे मावळे एकमेकांसमोर उभे आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राला भूषणवाह नाही. ते उभं होणं योग्य नाही, ते उभं होऊ नये असा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. मराठा समाजाच्या अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे. त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत ही आमच्या सरकारची कटिबद्धता आहे. आम्ही जे दिलं ते न्यायालयात टिकवलं. 

25 हजार जणांची पोलीस भरती झाली त्यामध्ये 10 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या. उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा, UPSC, MPSC मध्ये वाढावा यासाठी सारथीची निर्मिती केली. आज सारथीच्या माध्यमातून 51 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले. 12 IAS झाले. 18 IPS झाले.  480 जण MPSC च्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांवर गेले. सारथीची निर्मिती झाली म्हणून आमचं कल्याण झालं हे सर्वांनी सांगितलं, असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. 
 

Topics mentioned in this article