अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारची कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी धनंजय मुंडे यांचं राजीनामा देण्याचं ठरलं आहे. त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला आहे अशी बातमी समोर येत आहे. यामुळे नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या माहिती मुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती देणारी व्यक्ती ही एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळ होती. त्यामुळे आक्रमक विरोधकांसमोर पहिली विकेट धनंजय मुंडेंची पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला आता जवळपास तीन महिन्यांच्या कालावधी लोटलाय. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडचा मास्टरमाईंड असल्याचा दावा एसआयटी आणि सीआयडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आलाय. वाल्मिक कराडच्या आदेशानेच विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत संतोष देशमुखांची हत्या केल्याची बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलीय. त्यामुळे धनंजय मुडेंच्या अडचणी मात्र वाढल्यात. त्यातच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागलीय.
अशातच करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. धनंजय मुंडेंचा दोन दिवसांपुर्वीच राजीनामा झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा ही उद्या म्हणजे 3 फेब्रुवारीला अधिवेनशाच्या पहिल्या दिवशी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. करुणा मुंडे म्हणतात, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलाय. उद्या म्हणजे सोमवारी शंभर टक्के राजीनामा होणार आहे. वाल्मीक कराड दोषी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नाही असं त्या म्हणाल्या.
वाल्मिक कराडसोबत असलेले संबंध धनंजय मुंडेंनी ही कधीच लपवले नाहीत. कराडशी असलेल्या संबंधांबद्दल मुंडेंना विचारलं असता, वाल्मिक कराड हे आपल्या जवळचे आहेत, हे मी नाकारत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मी असेन किंवा पंकजाताई असेल, प्रत्येक नेत्यासोबत खाली काम करणारी एक टीम असते. त्यामध्ये असंख्य लोक असतात, माझ्या टीममध्ये वाल्मिक कराड हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय. तो कुणी केला? त्यामागे हेतू काय आहेत? किंवा ते खरंच दोषी आहेत का? हे न पाहता माझ्याविरोधात मीडिया ट्रायल चालवली जातेय. असं विधान धनंजय मुंडेंनी यापुर्वीच केलेलं आहे.
आता तेच कराड जर हत्येमागचे मास्टरमाईंड असल्याचं तपासयंत्रणा आरोपपत्रातून म्हणत असतील, तर अधिवेशन काळात धनंजय मुंडेंना लक्ष्य करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत. याची जाणीव खुद्द मुंडे आणि त्यांच्या पक्षनेतृत्वालाही आहे. किंबहुना अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडण्याबाबत सुतोवाचही केलं आहे. तर जरांगे पाटलांनीही सरकारविरोधातली टीकेची धार अधिक तीव्र केलीय. उद्यापर्यंत जर धनंजय मुंडे यांना बडतर्फ केलं गेलं नाही, तर पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासे करणार असं दमानिया यांनी सांगितलं. तर राजकीय गुंडाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीय.
सध्या माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंमुळे अजित पवार गटाची पुरती कोंडी झालीय. त्यातच सरकारला शंभर दिवस होण्यापुर्वीच दोन मंत्री आरोपांच्या घेऱ्यात असणं, ही बाब फडणवीस सरकारसाठीही निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे आता फडणवीस आणि अजित पवारांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्यामुळे विरोधकांच्या हल्ल्या आधीच दोन्ही मंत्र्याचे राजीनामे घेतले जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.