
संतोष देशमुखांची हत्या, त्यात वाल्मिक कराडचा सहभाग, पुण्यातील तरुणीवर झालेले अत्याचार, त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य, कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कृषी मंत्रिपदावर कायम ठेवण्याचा प्रकार, महापुरूषांबाबत झालेली वादग्रस्त वक्त्यव्य, लाडक्या बहीणींची योजनेतू बाहेर काढण्याचा प्रकार, शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला फडणवीसांनी दिलेली स्थगिती, या आणि या सारख्या अनेक मुद्द्यांच्या अधारावर महायुती सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी आपली भूमीका स्पष्ट केली. शिवाय सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरही बहीष्कार टाकला. विरोधकांच्या आक्रमक भूमीकेमुळे अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरोधी महाविकास आघाडीने महायुती सरकारने आयोजित केलेल्या चहपानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. सरकारमध्ये विसंवाद आहे. कृषी मंत्र्यांना कोर्टाने दोषी ठरवलं तरी त्यांना पदावरून हटवलं नाही. सुनिल केदार यांच्यावर दुसऱ्या क्षणाला कारवाई करण्यात आली होती. याची आठवण यावेळी दानवे यांनी केली. मग कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंवर का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे असा आरोपही यावेळी दानवे यांनी केला. कृष्णा आंधळेला अजूनही कसे पकडले गेले नाही असंही ते म्हणाले.
महिलांवरील अत्याचारात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. नुकतीच स्वारगेटमध्येही अशीच घटना घडली. त्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांना मंत्रिमंडळात राहाण्याचा कोणताही अधिकार नाही असंही दावने म्हणाले. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. ते अतिशय भयंकर आहे. शिवाय बीडमधील गुन्हेगारीत कोणाचा हात आहे हे ही समोर आले आहे. अशा स्थितीत हे लोक मंत्रिमंडळात कसे असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे महापुरूषांचा अपमान करत आहेत. अशा लोकांना सरकार संरक्षण देत आहेत. महापुरूषांचा अपमान करण्याची परंपरा तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी सुरू केली होती. तिच परंपरा या सरकारने कायम ठेवली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहीजे असंही ते म्हणाले.
कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा झाला आहे. आरोग्य विभागात घोटाळा झाला. त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थिगिती दिली आहे. एटीच्या टेंडरमध्येही घोटाळा झाला त्यातालाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आधिच्या शिंदे सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले होते. ते सरकार भ्रष्ट होते हे आता सिद्ध होत आहे. सध्या आरटीओ मार्फत नंबर प्लेट बसवण्याचं काम सुरू आहे. मात्र त्याचे दर हे तिन पट आहे. ज्या एजन्सींना हे काम दिले आहे ती एजन्सी कोणाची आहे अशी विचारणाही यावेळी दानवे यांनी केली आहे. तानाजी सांवत यांचा मुलगा बेपत्ता झाला. तो थायलंडला चालला होता. त्यासाठी राज्यातले पोलिस कामाला लागले. पण सर्व सामान्यांसाठी पोलीस असं करत नाहीत. मुंबईची स्थिती वाईट करून ठेवली आहे. कापूस सोयाबिन, तुर, हरभरा या पिकांची स्थिती वाईट आहे. नाफेडकडून खरेदी नाही. बारदानं नसल्यामुळे खरेदी नाही. अशी स्थिती असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. हा वाद सोडवण्यासाठी एका बैठकीला मुख्यमंत्री जातात तर उपमुख्यमंत्री जात नाहीत. या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तर आज राज्यात परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगारी करा, भ्रष्टाचार करा, अपमानजनक बोला, तुम्हाला लगेच वरची पद मिळतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. अशी विचारणा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. तर मुख्यमंत्री विरोधकांबरोबर संवाद ठेवत नाहीत. सत्तेचा माज आणि माग्रुरी चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे, ती बदलत चालली आहे. जोपर्यंत विरोधकांना त्यांचा जो मान आहे, तो दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world