
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी काही टवाळखोरांनी तिची छेड काढली. ही छेड राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढली असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच दिली. त्यानंतर हा आरोपी नक्की कोणत्या पक्षाचा याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा आहे हे आता समोर आले आहे. शिवाय तो कुणाचा कार्यकर्ता आहे, हे ही स्पष्ट झाले आहे. याची कबुलीच त्याच्या नेत्यानेही दिली आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकारचीच कोंडी होण्याची दाट शक्यात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई,सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे. यातील पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना दिली आहे. तो नगरसेवकरही राहीला आहे. त्याने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्याला या प्रकरणात गोवले गेले आहे. ज्यावेळी जत्रेत गोंधळ झाला त्यावेळी सोडवण्यासाठी म्हणून तो तिथं गेला होता. त्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे असंही पाटील म्हणाले.
आरोपी असलेल्या पियुष मोरेने भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तो भाजपचा नगरसेवक ही होता. तो आता माझ्या सोबत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याचं नाव जबरदस्तीने टाकलं गेलं आहे. पियुष मोरे हा भानगड सोडवण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याचे नाव टाकण्यात आले. तो जर दोषी असेल तर त्यावर कारवाई करावी. पण केवळ आरोप करून कुणी दोषी होत नाही, असं ही पाटील म्हणाले. जर तो दोषी ठरला तर त्याला फाशी द्या असंही ते म्हणाले. मात्र आधी पाटील यांनी आरोपींचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं आधी सांगितलं होतं.
या घटनेंची थेट दखल आधी मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केलं आहे. पोलिसाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना अटक केली आहे. उर्वरित लोकांना ही अटक होईल. परंतु त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं आहे. त्यांना अजिबात माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे हे राजकीय टवाळखोर नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचेही उत्तर आता समोर आले आहे.
मात्र हे कार्यकर्ते आता महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाचेच असल्याने एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झाली आहे. त्यात अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार समोर आला आहे. आधीच एकनाथ शिंदे यांच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका फडणवीसांनी लावला आहे. त्यात आता हे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंची कोंडी केल्याचे बोलले जात आहे. शिवाय शिंदेचे मंत्री असलेले योगेश कदम वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आहेत. शिवाय माजी मंत्र्यांचे घोटाळे समोर आल्याने शिंदेंची कोंडी झाली आहे. त्यात आता या प्रकरणाची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world