मविआचं जागावाटप विदर्भावर अडलं, 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी!

विदर्भातील जागावाटपावर काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तीव्र मतभेद झाले

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्यानं जागा वाटपांच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विदर्भाच्या मुद्यावर मोठं नाराजीनाट्य घडलं. 

विदर्भातील जागावाटपावर काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तीव्र मतभेद झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विदर्भात आमच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे आमच्या जागांचा दावा योग्य आहे, असं मत काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत मांडलं. त्याला संजय राऊच यांनी आक्षेप घेत उबाठा पक्षाला काही ठिकाणी जागा हव्यात अशी मागणी केली. त्यानंतर हा वाद झाला. नाना पटोले यांनी काही वेळ बैठकीच्या बाहेर जात नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी त्यांची समजूत काढून राऊत आणि पटोले यांना पुन्हा बैठकीला बसवले.

विदर्भातील बलाबल काय?

विदर्भात रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, अकोला, यवतमाळ-वाशिम, वर्धा, अमरावती बुलडाणा आणि नागपूर हे दहा लोकसभा मतदारसंघ येतात. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तारुढ महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीनं दहापैकी सात जागा जिंकल्या. तर महायुतीला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं.

( नक्की वाचा :  'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका )

विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं त्यापैकी 42 जागा जिंकल्या होत्या. तर महाविकास आघाडीला फक्त 15 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील निकालांच्या आधारावर या मतदारसंघाचा विचार केला तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट होतं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 35 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुतीला फक्त 22 जागांवर आघाडी होती.
 

Topics mentioned in this article