विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहे. कधी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट तर काही ठिकाणी भाजप विरूद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता एकनाथ शिंदे याचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेंना शह देण्याची रणनिती भाजपने आखल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेते करत आहेत. यातून एकमेकाला इशारा देण्याची भाषाही वापरली जात आहे. त्यातून वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. भाजप मोठा भाऊ आहे तर त्याने मोठ्या भावा सारखे वागावे नाही तर... असा थेट इशाराच कल्याणच्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यात जाणार हे निश्चित आहे. असं असतानाही या मतदार संघात भाजपकडून बंडखोरीची तयारी केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केला आहे. या आधीही या मतदार संघात भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली होती. यावेळीही ते बंडखोरीच्या तयारीत आहे. शिवाय भाजप शहर अध्यक्ष वरूण पाटील हे पण अपक्ष मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. याची वरिष्ठ भाजप नेत्यांनी दखल घ्यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली होती. जर भाजपकडून पुन्हा असेच होणार असेल तर कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड या मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे. त्या ठिकाणी शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच अरविंद मोरे यांनी दिला आहे. भाजप मोठा भाऊ आहे तर त्यांनी मोठ्या भावा सारखे वागावे. भाजपाने एकनाथ शिंदें यांच्या पाठीत सुरा खूपसण्याच्या प्रयत्न करू नये. तसे केले तर आम्ही सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील स्थानिक पातळीवरील वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात मागिल तिन्ही निवडणुकीत मतदारांनी वेगवेगळा जनादेश दिला आहे. भाजपचीही या मतदार संघात ताकद आहे. शिवसेनेत सध्या फूट पडली आहे. त्यामुळे सेनेत मत विभागणी अटळ आहे. शिवाय मनसेचा उमेदवारही मैदानात असणार आहे. त्यामुळे भाजपची एकसंध मत भाजप उमेदवाराला मिळाल्यास त्याचा विजय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप इच्छुकांनीही तयारी चालवली आहे. त्यामुळे इथं बंडखोरी होणार की ती रोखणार हे पहावं लागले.