अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli News : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या हल्ल्यात तीन निष्पाप डोंबिवलीकरांचा मृत्यू झालाय. दशहतवाद्यांना आणि पाकिस्तानला लवकरात लवकर धडा शिकविला पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीयांची आहे. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्याकडून या घटनेनंतर थेट मुस्लिमांचा आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यानं दुकाने आणि हॉटेलमध्ये जाऊन मुस्लिम कामगारांना ठेवू नका असे आवाहन एका मोठ्या व्यावसायिकाला केले आहे. तुमच्याकडे काम करीत असलेल्या सातही मुस्लिमांना लवकरात लवकर कामावरुन काढून टाका असा सज्जड दम भाजप पदाधिकाऱ्याने डोंंबिवलीतील द्वारका हॉटेल व्यवस्थापनास दिला आहे. यावर काँग्रेस आणि मनसेनेनं जोरदार टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. या नंतर डोंबिवलीकर नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र या दरम्यान डोंबिवली भाजपकडून आत्ता मुस्लिमांचा आर्थिक बहिष्कार करण्याची वेळ आली आहे, असा संदेश दिला जात आहेत. भाजपचे काही पदाधिकारी कार्यकर्ते डोंबिवली बंद दरम्यान मुस्लिमच्या एका कोंबडीच्या दुकानात गेले. त्यानंतर डोंबिवलीतील प्रसिद्ध द्वारका हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेलमध्ये मुस्लिम कामगार आहे. त्यांना कामावरुन काढून टाका असे हॉटेल मालकाला सांगितले. हॉटेलचे मालक रमेश कुटेकर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
हे प्रकरण समोर आल्यावर काँग्रेस प्रदेश पदाधिकारी नवीन सिंह यांनी भाजपच्या या आवाहनावर जोरदार टीका केली आहे. भाजपा कार्यकर्ते मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आहेत. ते चुकीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व थांबवलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
( नक्की वाचा : 'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग )
मनसे देखील आक्रमक
मनसे नेते राजू पाटील यांनीही या प्रकरणात ट्विट करत भाजपावर टीका केली आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ?
जेव्हा हे घडलं तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला म्हणून सर्वांना सांगितलं मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला? ह्याचं उत्तर कोण देणार? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.