Maharashtra Local Body Election 2026: राज्यात पहिला उमेदवार बिनविरोध, 'या' ठिकाणी शिवसेनेनं खातं उघडलं

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यात पहिले खाते उघडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dr Padmaja Kambale Shivsena Unopposed Candidate

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Shivsena Unopposed 1st Candidate In Maharashtra : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यात पहिले खाते उघडले आहे. रत्नागिरीच्या नाणीज पंचायत समिती गणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉक्टर पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या बिनविरोध निवडून येणाऱ्या राज्यातील पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी  कांबळे यांच्याशिवाय एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पद्मजा कांबळे यांचा एकमेव अर्ज निवडणुकीत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. राज्यातील शिवसेनेचा (शिंदे गट)हा पहिलाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?

उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय चर्चांना उधाण

रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी हा बालेकिल्ला आहे.या निवडणुकीत आपल्या बालेकिल्ल्यात नगर परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं वर्चस्व राहिलं.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही सामंत यांचंच म्हणजे शिवसेनेचं वर्चस्व राहणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करून त्यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पद्मजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.दुपारपर्यंत सर्वांचे लक्ष नाणीज गणाकडे लागले होते.मात्र डॉ.पद्मजा कांबळे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आपला अर्ज दाखल केला नाही.परिणामी,डॉ. कांबळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Ulhasnagar News : उल्हासनगरात शिवसेनेने केला भाजपचा गेम, मॅजिक फिगरचा आकडा गाठला, पण श्रीकांत शिंदे म्हणाले..

विजयी सलामीने शिवसैनिकांमध्ये उत्साह 

निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाआधीच शिवसेनेने पहिली जागा खिशात घातल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. डॉ.पद्मजा कांबळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित चेहरा पंचायत समितीवर जाणार असल्याने ग्रामस्थांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.या बिनविरोध निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इतर जागांवरही शिंदे शिवसेनेचे पारडे जड राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उदय सामंत यांच्या या यशस्वी रणनीतीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.