Eknath Shinde on Sharad Pawar : शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या व्यक्तींकडून हा पुरस्कार मिळणे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'पवारांनी मला गुगली टाकला नाही'
एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं की, 'हा पुरस्कार महादजी शिंदे यांच्या नावानं आहे. मी एकनाथ शिंदे आहे. इथं ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित आहेत. तसंच भारताचे बॉलर सदानंद शिंदे हे शरद पवारांचे सासरे आहेत. एकप्रकारे इथं सर्वच शिंदेच एकत्र आले आहेत.
सदू शिंदे हे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. पवारसाहेबांची देखील राजकारणाची गुगली देखील अनेकांना कळत नाही. पण, माझे आणि पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली कधी टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत हा विश्वास आहे, असा सिक्सर एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
( नक्की वाचा : Parvesh Verma : प्रवेश वर्मांनी लग्नापूर्वी पत्नीसमोर ठेवली होती अजब अट, पूर्ण न झाल्याची आजही खंत )
आम्ही आमच्या शालेय शिक्षण विभागामध्ये महादजी शिंदे यांच्यावरील धडा घेऊ शकतो. तशा सूचना मी देईन. महान व्यक्तीमत्त्वाचा विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणे हाच सन्मान आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. महादजी शिंदेच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक कण्हेर खेडला करावं यासाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
मोहीम हातात घेतली की ती प्राणपणाने लढून ती फत्ते करायची हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा बाणा आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. माझ्यासोबत काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा आहे, माझ्यावर माया असणाऱ्या लाडक्या बहिणींचा आहे. असं शिंदे यांनी सांगितलं.
देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा हे पाठीशी होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करायला मिळाला. पवार साहेबांनी देखील वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. पक्ष कोणताही असला तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं कसं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकले पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.