राकेश गुडेकर
कोकणात शिवसेनेची मोठी ताकद आहे. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंचे अनेक शिलेदार हे एकनाथ शिंदेंच्या जवळ गेले. आधी लोकसभेत ठाकरेंनी मतदारांनी दणका दिला. त्यानंतर विधानसभेतही ठाकरेंच्या हाती फार काही लागलं नाही. विद्यमान आमदारांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भास्कर जाधव वगळता सर्व उमेदवार पराभूत झाले. लोकसभा विधानसभे पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही ठाकरेंना धोबीपछाड देताना शिंदे गट दिसत आहे. त्याचीच झलक दापोली नगरपंचायतीत दिसून आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोपोली हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मतदार संघ आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचा हा गड मानला जातो. शिंदे सनेत गेल्यानंतर कदम यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला होता. दापोलीची नगरपंचायत ही शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात होती. मात्र ठाकरे गटाच्या आठ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे दापोलीच्या नगरपंचायतीमधील सर्व चित्र पालटलं आहे.
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्याविरोधात 13 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्या शिवसेना ठाकरे गटात होत्या. त्या पायउतार झाल्यामुळे आता नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 28 मे रोजी होणार आहे. नगरसेवक कृपा घाग यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धवसेनेच्या आठ नगरसेवकांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर दापोली नगरपंचायतीतील समीकरणे बदलली होती.
त्यानंतर नगराध्यक्ष ममता मोरे यांना पदावरून हटविण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानंतर ममता मोरे यांच्याविरोधात 5 मे 2025 रोजी नगर पंचायतीत अविश्वास ठरावच मांडला गेला. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदाचा पदभार स्वीकारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून आल्यानंतर खालिद रखांगे यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, या पदासाठी 28 मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. या पदासाठी कृपा घाग यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.