End of Nitish Era in Bihar? : बिहारच्या राजकारणात सध्या एका मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत असून पाटणापासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे असून बिहारमध्ये लवकरच मोठा सत्ताबदल पाहिला मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असून बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
का सुरु झाली चर्चा?
जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा अचानक दिल्लीहून पाटण्याकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संजय झा यांनी पाटण्याला निघण्यापूर्वी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांची भेट घेतली असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सतत संपर्कात असल्याचे समजते. या घडामोडींमुळे बिहारमध्ये सत्तेचे समीकरण बदलणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा भाजपच्या नेत्याकडे सोपवून नितीश कुमार दिल्लीत मोठी जबाबदारी स्वीकारतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: 'मातोश्री' होणार होते तात्पुरते जेल! भुजबळांनी सांगितली बाळासाहेबांच्या अटकेची Inside Story )
निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद
या संपूर्ण सत्तानाट्यात सर्वात महत्त्वाची चर्चा ही नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्याबद्दल होत आहे. आतापर्यंत निशांत कुमार हे राज्यसभेवर जातील अशी शक्यता होती, मात्र ताज्या सूत्रांनुसार, बिहारच्या नव्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. राजकारणापासून दूर राहणारे निशांत कुमार गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात आणि वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अधिक सक्रिय दिसले होते. त्यामुळेच त्यांच्या राजकीय एन्ट्रीची तयारी पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )
नितीश कुमार यांचा नवा प्रवास
नितीश कुमार यांचे आरोग्य आणि बिहारमधील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता, त्यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 1 मार्च रोजी आपल्या वाढदिवसानंतर नितीश कुमार यांनी घेतलेला हा निर्णय बिहारच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा मोठा बदल करून भाजप आणि जेडीयू नवीन रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. या बदलामुळे बिहारमधील प्रशासकीय आणि राजकीय घडी पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world