EVM मधला निकाल बदलला, जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला

सुप्रीम कोर्टासमोर दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल फिरलाय. त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

EVM News: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएममधला निकाल चुकीचा ठरला आहे.  हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावातला सरपंच बदलला आहे. ज्या सरपंचाला विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्याला आता पराभवाचा धक्का बसला आहे. तर जो सरपंच हरला होता, तो जिंकला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल दोन वर्षांपूर्वीचं आहे. हरियाणातल्या पानिपतमधल्या बुआना लाखू गावात 2 नोव्हेंबर 2022 ला सरपंचपदाची निवडणूक झाली होती. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात आली. त्याच निवडणूकीता निकाल आता बदलला आहे.  

मोहीतकुमार आणि कुलदीप या दोन उमेदवारांमध्ये ही लढत झाली होती. या निवडणुकीत सुरुवातीला मोहितकुमारला विजयी घोषित करण्यात आलं होतं.  मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला 51 मतांनी विजयी घोषित केलं. मोहितकुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं.  पुढच्या दहा दिवसांमध्ये हायकोर्टानं सरपंचपदाच्या निवडणुकीच्या निकालाला स्थगिती दिली होती. मात्र फेरमतमोजणीची मागणी हायकोर्टानं फेटाळली होती. 

नक्की वाचा: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा! 

तरी ही मोहितनं हार मानली नाही. त्याने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. हरियाणामधल्या बुआना लाखू गावातल्या सरपंचपदावरच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात तब्बल दोन वर्षांनी तारीख आली. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली फेरमतमोजणी व्हावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 7 जुलैला सुप्रीम कोर्टात दोन वर्षांपूर्वीची ईव्हीएम मशीन्स उघडण्यात आली. फक्त वाद असलेल्या बूथवरची नव्हे तर सरसकट सगळ्या बूथवरच्या मतमोजणीचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानुसार सगळ्या बूथवरच्या ईव्हीएममधली मतं मोजण्यात आली. या मतमोजणीत दोन वर्षांपूर्वीचा निकाल बदलला. कुलदीपला 1 हजार तर मोहितला 1051 मतं मिळाली. सुप्रीम कोर्टानं मोहितला विजयी घोषित केलं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तब्बल दोन वर्षांनी बुआना लाखू गावाचा सरपंच बदलला. मतदारयाद्या घोळ, ईव्हीएमविरोधात विरोधक आरोप करत असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएममधला निकाल बदलला आहे.  त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.  मोहीतकुमार प्रमाणे लढलो तर मोदी राहणार नाहीत, असं संजय राऊतांनी म्हटले.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत.  विधानसभा निवडणूक झाल्या झाल्या राज ठाकरेंनीही ईव्हीएमवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Advertisement

 नक्की वाचा:  PM मोदींनी GST बद्दल केलेल्या घोषणांचा अर्थ काय? कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

मतदारयादीत मोठे घोळ झाल्याचा राहुल गांधींसह विरोधकांचा आरोप आहे. महाराष्ट्राची निवडणूक ईव्हीएमच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांनी जिंकली असा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत. महाराष्ट्रात लोसकभेला मविआची सरशी झालेली असताना चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय कसा झाला, असा मविआचा सवाल आहे. काही लोकांनी भेटून आपल्याला निवडणुकीत विजयी करुन देतो, अशी ऑफर दिल्याचा शरद पवार आणि संजय राऊतांचा दावा आहे. ईव्हीएम आणि मतदारयाद्यातल्या घोळांवरुन निवडणूक आयोगाकडे विरोधक बोट दाखवत असतानाच सुप्रीम कोर्टासमोर दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल फिरलाय. त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.