
शिवसेना शिंदे गटात नवा उदय होणार याची चर्चा राजकीय वर्तूळात होती. एकनाथ शिंदे गटात असंतोष आहे. शिवाय लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळे अशी वक्तव्यही विरोधी पक्षाकडून केली जात होती. यातून उद्योग मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं जात होतं. त्याला आता उदय सामंत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात्या प्रमुख नेत्यांना फोडत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र येत्या 15 तारखेला कोकणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य सामंत यांनी केले आहे. यावेळी ठाकरे गटाचा मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी उबाठाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी राजीनामा दिला होता. आज बंड्या साळवी यांच्यासह काही उबाठाचे पदाधिकारी, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत या सर्वानी रत्नागिरी येथे भव्य कार्यक्रमात प्रवेश केला. उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर यांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाता आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोकणाने ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिल्याचे दिसून येत आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला. कोकणात केवळ एकच आमदार निवडून आला. त्यानंतर आता ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्याचे तंत्र शिवसेना शिंदे गटाने अवलंबले आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज आहेत. ते ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचे बोलले जाता आहे. अशा वेळी ठाकरे गटातील आणखी एक बडा नेता शिंदेंच्या गळाला लागला असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे.
शिवसेनेत कोणते माजी आमदार प्रवेश करणार आहेत. ते नाव 15 तारखेला कळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 तारखेला रत्नागिरीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश होतील. त्यावेळी हे नाव कळेल अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरीत शिवसेनेत झालेल्या पक्ष प्रवेशानंतर ते पत्रकारां बरोबर बोलत होते. तसेच रत्नागिरीतील पक्ष प्रवेशाची दखल अख्या महाराष्ट्राने घेतली असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले. माजी आमदार राजन साळवींनाही सामंत यांनी यावेळी टोला लगावला. त्या माजी आमदारांकडे आमचं अजिबात लक्ष नाही, असं सांगत ते माजी आमदार राजन साळवी नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे ठाकरेंना एकएक मोहरा सोडून जात असताना रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सचिन कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय शिवसेनेच्या सदस्यपदाचा देखील दिला राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सचिन कदम हे माजी जिल्हा प्रमुख आहेत. सध्या तरी आपण कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माजी खासदार अनंत गीते यांचे विश्वासू म्हणून सचिन कदम यांची ओळख आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world