विधानसभा निवडणुकीची कधी ही घोषणा होवू शकते. मात्र महाविकास आघाडी बरोबरच महायुतीत ही मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. कार्यकर्ते आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आतापासूनच बॅनरबाजी करत आहे. आता महायुतीतल्या दोन नेत्यांच्या बॅनरबाजी राजकीय वर्तूळात रंगली आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदाचे तीन दावेदार आहे. त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे. या तिघांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा कधीही लपून राहीली नाही. पण आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जावू असे सांगितले जात असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोण असावा याचे प्रदर्शन केले जात आहे. त्यामुळेच नांदेड आणि बारामतीत लागलेल्या बॅनरची सध्या चर्चा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या सर्वत्र गणपती उत्सव साजरा केला जातोय. बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असणारे गुलाबी बॅनर लागले आहेत. मात्र अशातच बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावलाय. हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या अनेक दिवसापासून बारामतीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार पवार मुख्यमंत्री व्हावेत. या आधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते.
ट्रेंडिंग बातमी - NDTV मराठीचा दणका! अखेर त्या सातबाऱ्यावरचे 'पाकिस्तान' हे नाव हटवले
एकीकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले असताना दुसरीकडे अशोक चव्हाणांच्या गडात ही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. हे बॅनर आहेत देवेंद्र फडणवीस याचे. नांदेड शहरात ठीक ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले . अंनत चतुर्थीच्या निमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यावर फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे . महायुतीत अजून जागा वाटप झालं नाही , मुख्यमंत्री कोण असणार हे जाहीर झालं नसताना नांदेड मध्ये मात्र फडणवीस यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणुन त्यांचे बॅनर लावले. या बॅनरवर सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता असा उल्लेख करण्यात आला आहे.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
मुख्यमंत्री कोण या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनी तर मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा बोलूनही दाखवली होती. तर आधी एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण आता महायुतीचा मुख्यमंत्री असेल असं ते सांगत आहेत. तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांचे मंत्री आणि आमदार सांगत आहेत. त्यामुळे सध्या महायुतीतले तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग लावून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ट्रेंडिंग बातमी - दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?
महायुती प्रमाणे महाविकास आघाडीतही सध्या मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर पण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो असे वक्तव्य केले होते. पण त्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. आधी महायुतीचं सरकार हटवू मग मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेवू अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवारांनी घेतली होती.